आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात निःस्वार्थ प्रेम मिळवणे म्हणजे समुद्रामध्ये मोती शोधण्यासारखे बनले आहे. एखाद्या व्यक्तीवर निस्वार्थपणे प्रेम करणे ही गोष्ट आजच्या पिढीसाठी “आऊट ऑफ फॅशन” आहे. आयुष्य जितक्या वेगाने चालत आहे, त्यापेक्षाही जास्त वेगाने आपल्या गरजा धावत आहेत.
प्रेम करण्यासाठी आजच्या पिढीकडे वेळ नाही. त्यांच्यासाठी अशा प्रेमकथा या एखाद्या चित्रपटाच्या कथेसारख्या असतात. परंतु नुकतेच बांगलादेशचा प्रसिद्ध छायाचित्रकार जीएमबी आकाशने आपल्या फेसबुकवर रजिया बेगम या वेश्या आणि अब्बास मेह या अपंग भिकाऱ्यामधील प्रेमकथा शेअर केली आहे, जी इंटरनेटवर चांगलीच व्हायरल होत आहे.
काय आहे रजिया आणि अब्बासची प्रेमकहाणी
आपल्या प्रेमकहाणी विषयी रजिया सांगते की, “मला माझे वय आणि आईवडिलांविषयी काहीही माहिती नाही. पण आयुष्यात पुन्हा प्रेम करणे ही कुणासाठी सोपी गोष्ट नाही, विशेषत: वेश्यांसाठी. मी माझे आयुष्य रस्त्यावर घालवले. माझ्या मुलीमुळे आज मी जिवंत आहे. माझी मुलगी कधीकधी मला विचारते, अम्मा तु एवढ्या रात्री का कामावर जाते ? पण माझ्याकडे या निष्पाप मुलीच्या प्रश्नाचे उत्तर नव्हते. या दलदलीतून मला बाहेर पडायचे होते, पण मला मार्ग सापडत नव्हता आणि कुणी मदतीलाही येत नव्हते.”
ज्या दिवशी रजिया पहिल्यांदा अब्बासला भेटली त्यादिवशी जोरदार पाऊस पडत होता. रजिया एका झाडाखाली उभी होती आणि कामावर जाण्यासाठी दिवस मावळण्याची वाट बघत होती. झाडाच्या दुसऱ्या बाजूला व्हीलचेअरवर एक भिकारी होता, अब्बास ! आपल्या मुलीकडे जाण्यासाठी रजिया मोठमोठ्याने रडत होती, ओरडत होती. तेवढ्यात अचानक व्हीलचेयरच्या चाकांचा आवाज आला.
अब्बासने रजियाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, पण रजियाने माझ्याकडे कोणत्याही भिकाऱ्याला द्यायला पैसे नाही म्हणत तसेच पाणावलेल्या डोळ्यांनी अब्बासला फटकारले. पण अब्बासनेच खिशातून एक नोट काढत माझ्याकडे एवढेच पैसे आहेत म्हणत ती नोट रजियाला देण्यासाठी हात पुढे केले. रजिया एकटक त्याकडे बघत राहिली. अब्बासने तिला वादळ येणार आहे म्हणत घरी जाण्याची सूचना केल्यानंतर रजियाने ती नोट घेतली आणि ती घरी गेली.
घरी आल्यानंतर रजिया खूप रडली. पहिल्यांदा कुणीतरी तिचा वापर न करता तिला पैसे दिले होते. त्यांनतर रजियाने त्या भिखाऱ्याचा खूप शोध घेतला. एके दिवशी एका झाडाखाली तिला तो भिकारी सापडला.
अपंग असल्यामुळे त्याच्या पत्नीने त्याला सोडून दिले होते. रजियाने धाडस करून अब्बासला सांगितले, की ती पुन्हा प्रेम करु शकणार नाही पण व्हीलचेअर वाल्याला आयुष्यभर सांभाळून ठेऊ शकते. अब्बासने स्मितहास्य करत सांगितले, प्रेम असल्याशिवाय कोणी अपंगाला सांभाळणार नाही.
रजिया आणि अब्बास यांच्या लग्नाला आता चार वर्षे झाली आहेत. लग्नाच्या वेळी अब्बासने रजियाला तिच्या डोळ्यात अश्रू न येऊ देण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या ताटात खायला घास कमी होते, पण त्यांच्या आयुष्यात इतके प्रेम होते की चार घासांनीही त्यांच्या घराचे पोट भरले होते. रझियाच्या मुलीनेही वडिलांना आनंदाने स्वीकारले होते. या कुटुंबाने अनेक वाईट दिवस एकत्रित घालवले, परंतु रजिया परत कधीच कुठल्या झाडाखाली उभी राहून रडली नाही, कारण अब्बासने आपले वचन पाळले होते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.