महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप-शिवसेना महायुतीला १६५ पर्यंत जागा मिळाल्या आहेत, तर काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीला ११० पर्यंत जागा मिळाल्या आहेत. भाजप-शिवसेना एकत्र आल्यास सहज सरकार स्थापन करता येईल,मात्र मुख्यमंत्रीपदाच्या वाटणीवरुन दोघांमध्ये अद्याप एकमत झाले नसल्याने सरकार स्थापनेचा विषय रेंगाळला आहे. अशामध्ये भाजप-शिवसेनेत सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र आहे.
भाजपने कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे, तर शिवसेनेकडे कॉग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर आपला मुख्यमंत्री करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. पण शिवसेना काँग्रेसची मदत घेईल का हाच मुख्य प्रश्न आहे. इतिहासात डोकावले तर हे होऊ शकते असे म्हणण्याइतपत परिस्थिती आहे. यापूर्वीही शिवसेना आणि काँग्रेस पाच प्रसंगात एकत्र आल्याची उदाहरणे आहेत.
१) वसंतसेना :
महाराष्ट्र राज्य स्थापना झाल्यानंतर काही वर्षातच मुंबईमध्ये कामगार चळवळ वाढीस लागली होती. डावे पक्ष काँग्रेसला आव्हान द्यायला उभे राहिले होते. त्याच काळात १९६६ मध्ये शिवसेनेची स्थापना झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री असणारे काँग्रेसचे वसंतराव नाईक यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधाची त्यावेळी चांगलीच चर्चा व्हायची. मुंबईमधील डाव्या पक्षांची ताकत कमी करण्यासाठी काँग्रेसने शिवसेना पोसल्याचे आरोपही त्यावेळी झाले. गमतीने शिवसेनेला वसंतसेना म्हणूनही हिणवण्यात आले होते.
२) आणीबाणी :
इंदिरा गांधी देशाच्या प्रधानमंत्री असताना त्यांनी देशात आणीबाणी आणली होती. महाराष्ट्रात शंकरराव चव्हाण त्यावेळी मुख्यमंत्री होते. आणीबाणीला विरोध करणाऱ्यांचे अटकसत्र सुरु झाले होते. शंकरराव चव्हाणांची बाळासाहेब ठाकरेंना निरोप पाठवून आणीबाणीचे समर्थन करा किंवा इतर नेत्यांप्रमाणे अटक व्हा असा पर्याय ठेवला.
त्यावेळी बाळासाहेबांनी आणीबाणीचे समर्थन करण्याचा पर्याय निवडला. एवढेच नाही आणीबाणीनंतर जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी इंदिरा गांधींना अटक केली होती, त्याचाही विरोध करत शिवसेनेने बंद पाळला होता.
३) महापौर :
१९७७ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली होती. काँग्रेसने मिलिंद देवरा यांना महापौरपदी बसवण्याचा निर्णय घेतला. मुरली देवरा यांचे सर्व पक्षातील नेत्यांशी मधुर संबंध होते. शिवसेनेने देखील मिलिंद देवरा यांना महापौर करण्याच्या काँग्रेसच्या निर्णयाला उघड पाठिंबा दिला होता.
४) प्रतिभाताई पाटील :
२००७ साली काँग्रेसने प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली होती. भाजपने भैरोवसिंह शेखावत यांना उमेदवारी दिली होती. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर बाळासाहेब ठाकरेंनी प्रतिभाताई पाटलांना राष्ट्रपती करण्याच्या मुद्द्याला पाठिंबा दिला होता.
५) प्रणव मुखर्जी :
२०१२ सालीही काँग्रेसने प्रणव मुखर्जी तर भाजपने पी.ए.संगमा यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी बाळासाहेब ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्री बंगल्यावर गेले. बाळासाहेबांशी त्यांनी चर्चा केली. त्यांनतर बाळासाहेबांनी काँग्रेसच्या प्रणव मुखर्जींना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.