राजकारण हे समाजकारणाचं प्रभावी माध्यम मानलं जातं. एव्हाना कित्येक राजकीय नेते त्याला प्रमाण मानूनच राजकारणात आले मात्र मातीतल्या माणसांना सन्मान द्यावा, रंजल्या – गांजल्या समाजाचा उत्कर्ष करावा प्रशासनाला सामान्यांची तळमळ समजावून देत व्यवस्थेला माणूसपण द्यावं अशी जिद्द बाळगून संघर्षाला निघालेले राम विठ्ठल सातपुते आता एका वळणावर विसावले.
मराठवाड्याच्या मातीत निर्माण झालेलं अन महाराष्ट्राच्या मातीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून बहरलेलं नेतृत्व आता महाराष्ट्राच्या राजकारणात ताठ मानेनं उभारू पाहतंय. बीड जिल्ह्यातील आष्टी तालूक्यातील डोईठाण या गावी अतिशय सामान्य कुटुंबात जन्माला आलेला राम विठ्ठल सातपुते माळशिरस विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचा आमदार झाले. राम ते रामभाऊ हा प्रवास जितका यातना देणारा आहे तेवढाच जिद्दी असल्याचं रामभाऊ बऱ्याचदा सांगतात. बालपणापासुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघात स्वयंसेवक म्हणून सक्रियपणे सहभागी झाल्यामुळे राष्ट्रप्रेमाचे बाळकडू अंगात भिनत गेलं.
गलथान व्यवस्थेमुळे सामान्य माणसांना होणाऱ्या वेदना आणि त्रास यातून राम नावाचं वादळ अंगार होऊ पाहत होतं. मात्र पिढ्यानपिढ्या सोबत असलेली गरिबी, रोजीरोटीसाठी ऊसतोड मजूर म्हणून पश्चिम महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यात कामासाठी निघणारे आई – वडील, अन आई वडिलांसोबत मोळ्या बांधत, वाडं वेचत संघर्षाची स्वप्न गिरवणारा, नशिबाला आव्हान देत मोसमी शाळा शिकणारा राम. खरंतर या सगळ्या गरिबीच्या, संघर्षाच्या प्रवासानंतर मात्र महाविद्यालयीन शिक्षणासाठी रामभाऊ पुण्यात आल्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आले अन सुरु झाला एक नवा संघर्ष.
“समाज– प्रशासन अन शासन” याच्याभोवती फिरत कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केल्यानंतर अभाविपच्या विविध जबाबदाऱ्या निर्विवाद पार पाडल्या. पुण्यात काम करत असताना शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात दिलेला यशस्वी लढा असेल, शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे म्हणून केलेला यल्गार असेल, शिक्षण खात्यातल्या भ्रष्ट अधिकाऱ्याला घरी पाठवा म्हणून फोडलेला हुंकार असेल, अरुंधती रॉय तसेच विनायक सेन यांच्याविरोधी केलेले आंदोलन असेल किंवा शहरी नक्षलवाद्याच्या विरोधात फुंकलेलं रणशिंग असेल.
आघाडी सरकारच्या भ्रष्टाचारावर केलेले सडेतोड भाषण असेल. आपल्या ओघवत्या मात्र तडफदार शैलीत वक्तृत्वाच्या माध्यमातून छात्रनेता “राम विठ्ठल सातपुते” महाराष्ट्रभर आपली छाप उमटवू शकला. अनेक आंदोलनं अक्षरशः महाराष्ट्रभर गाजली. अभाविपच्या कामातील आक्रमकपणा आणि अभ्यासु नेतृत्वगुणांमुळे अभाविपने महाराष्ट्र प्रदेशावर विविध जवाबदाऱ्या दिल्या आणि रामभाऊंनी त्या यशस्वीपणे पार पाडल्याही.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रीय असताना रामभाऊंचा सहवास लाभला. मार्गदर्शन लाभले, संघर्षाचा सोबती म्हणून अन ग्रामीण भागाच्या कल्याणाची असलेली ओढ आमच्या व्यक्तिगत मैत्रीला अधिक दृढ करत गेली. प्रदेशमंत्री जबाबदारी घेतल्यानंतर केलेल्या भाषणात शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना पाहिलेला रामभाऊ आजही तसाच आहे. खेड्यापाड्यातनं येऊन संघर्ष शिकलेल्या या दिलदार मार्गदर्शक बंधूंना खूप जवळून अनुभवलं.
आपल्या जन्मापासून वेगवेगळ्या वळणावर संघर्ष करत, संघर्ष शिकत व्यवस्थेला आव्हान देणारा रांगडा योद्धा आता थेट राजकीय रणांगणात उतरला. खरंतर राजकारणात जाऊन आपल्या मातीतल्या माणसांना सन्मान देण्याची असलेली तीव्र ओढ आमदारपदापर्यंत घेऊन आली. या व्यवस्थेने ज्या अंत्योदय कष्टकरी, भाबड्या माणसांचा जाच केला त्या व्यवस्थेला जाब विचारणारा अन प्रसंगी व्यवस्था बदलू पाहणारा धगधगता युवा नेता म्हणून राज्यभरातले मायबाप रामभाऊकडे पाहताहेत. रामभाऊ आमदार झाल्यानंतर राज्यातल्या कित्येक घरात आनंदोत्सव साजरा झाला, कारण आपल्या जवळचा, आपल्यातला माणूस आमदार झाला ही भावना प्रत्येकाच्या मनात आहे.
खरंतर रामभाऊंच्या आयुष्यात संघर्ष नवा नाही. कुटुंबाच्या सामान्यतेची अनुभूती देणाऱ्या तरल आठवणी मात्र अनेक आहेत. रामभाऊंना माळशिरस विधानसभा मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी जाहीर झाली आणि रामभाऊ आई वडिलांचे आशीर्वाद घ्यायला आपल्या मूळ गावी डोईठाणला गेले खरंतर विधानसभा, आमदार, निवडणूक, राजकारण या सगळ्यांचा थांगपत्ता नसणाऱ्या रामभाऊंच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर “रामचं चांगलं होणार” याचाच आनंद होता.
रामभाऊंनी आईच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर आईंनी “गरिबांसाठी काम कर” असा आशीर्वाद दिला अन जवळची 100 रुपयांची नोट रामच्या हातावर ठेवत डोक्यावरून हात फिरवला. खरंतर त्या 100 रुपयांचे मोल रामभाऊंच्या आयुष्यात सर्वात जास्त आहे. आयुष्यभर काबाडकष्ट करणाऱ्या डोईठाण ता. आष्टी, जि. बीड इथे असणाऱ्या गरिबांसाठी काम कर, चांगलं काम कर असा आशीर्वाद देणाऱ्या आई – वडिलांना रामभाऊंनी समाजसेवेचा वसा कायम आणि प्रामाणिक ठेवावा असं वाटत राहतं.
खेड्यामातीतला सामान्य पोरगा आता भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष, आमदार पदापर्यंत पोहचला याचं कारण म्हणजे उसळत्या रक्तात असलेला सामान्याच्या न्यायाचा आवाज. आगामी काळात हे नेतृत्व महाराष्ट्राच्या खोऱ्यात आपला आवाज घुमवेल. विरोधकांची मक्तेदारी मोडून काढत सामान्य माणसांचा हक्काचा आवाज होईल ही अपेक्षा आणि विश्वास आहे. रामभाऊंच्या जुन्या घराचा फोटो पाहिल्यानंतर मात्र अंतर्मुख व्हायला होतं.
“अब राजा का बेटा राजा नहीं, जो हकदार हैं वही राजा बनेगा ।” या ओळी सत्यात उतरल्या यावर विश्वास बसतो. ज्या घरातून संघर्षाचं, समाज उत्कर्षाचं स्वप्न पाहिलं ते डोईठाणमधलं घर अनेकांना प्रेरणा देणारं ठरतं. खरंतर परिवर्तन हवं असेल तर अंत्योदय घटकांचं जगणं जगलेली, भोगलेली माणसं सभागृहात जायला हवी असं सातत्यानं वाटतं. आणि रामभाऊ सातपुते याचं मूर्तिमंत उदाहरण आहेत. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर रामभाऊ जेव्हा आई वडिलांना भेटायला गेले तेव्हा आईंनी प्रश्न केला की “आमदाराचं काम काय असतं?” खरंतर या प्रश्नामागे दुःख, चिकित्सकपणा, भीती, उत्सुकता आणि आपुलकी आहे.
कारण राम आमदार झाला मात्र आपल्यासारखं काबाडकष्ट तर त्याला करावं लागणार नाही न ! याची धास्तीही होती. काम माहिती झाल्यानंतर मात्र “तू इठ्ठलाचं काम करतो, म्हणजे चांगलं काम करायला मिळतंय” असं समाधान आणि तरलपणाही पाहायला मिळाला. रामभाऊ आज विधानसभेच्या सभागृहात जरी गेले असले तरी याच मातीनं उंच भरारी घेण्याची विलक्षण गती दिली आणि संघर्षांला बळ दिले हे विसरणार नाहीत.
मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी राम सातपुतेंच्या खांद्यावर दिली त्यावेळी भगवतगीता भेट दिली होती. हा केवळ योगायोग नाही तर संघर्षाला विचारांची जोड देऊन पाठीवर दिलेली ही थाप होती.
आज युवा आमदार म्हणून विधानसभेत प्रवेश करणारे रामभाऊ बदलत्या राजकारणाची नांदी आहेत. उद्याच्या परिवर्तनासाठी, विकासासाठी आणि उत्कर्षासाठी रामभाऊंनी काम करत “नव्या पिढीचा युवा दमदार नेता” होणं आणि शेवटच्या माणसाला न्याय देणं हेच घराणेशाहीच्या राजकारणात अन महाराष्ट्राच्या डोळ्यात अंजन घालणारं ठरेल.
– विकास विठोबा वाघमारे सोलापूर 8379977650 #रामराज्य