विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शिवसेना भाजपमध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु झाली आहे. दोन्ही पक्ष आपलाच मुख्यमंत्री व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत. दोन्ही पक्षाकडून त्यादृष्टीने पाऊलं टाकण्यात येत आहेत.
निकालानंतर अनेक मजेशीर तर काही धक्कादायक बाबी समोर आल्या. काही उमेदवारांचा खूप कमी मतांनी पराभव झाला तर काही मतदारसंघात सर्वच उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला वंचित बहुजन आघाडीमुळे तब्बल २५ जागांचा फटका बसला. अशाच अनेक गोष्टी निकालातून समोर आल्या.
दरम्यान कोणत्या आडनावाचे किती उमेदवार निवडून आले याच्या देखील चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहेत. तर नेमकं कोणतं आडनाव आहे आणि कोणतं नाव आहे ज्याचे उमेदवार जास्त निवडून आले हे जाणून घेऊया.
महाराष्ट्राच्या विधानसभेत पाटील आडनावाचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले आहेत. पाटील आडनावाचे तब्बल २७ उमेदवार निवडून आले आहेत. पाटील आडनावानंतर दुसऱ्या क्रमांकावर पवार आडनाव राहील आहे. पवार आडनावाचे ७ आमदार निवडून आले आहेत. तर त्याखालोखाल शिंदेचा नंबर लागतो. शिंदे आडनावाचे ६ आमदार निवडून आले.
हि झाली आडनावाची गोष्ट. पण नावाचा विचार केला तर एकाच नावाचे तब्बल ११ उमेदवार निवडून आले आहेत. यंदा विधानसभेत संजय नावाचे तब्बल ११ आमदार निवडून आले आहेत. मागच्या विधानसभेत संजय नावाचे १० आमदार होते.
कोणते पाटील आले निवडून?
पाटील नावाचे राष्ट्रवादीकडून ७ उमेदवार निवडून आले आहेत ज्यामध्ये दिलीप वळसे पाटील (आंबेगाव), जयंत पाटील (इस्लामपूर), सुमनताई पाटील (तासगाव), अनिल पाटील (अंमळनेर), बाबासाहेब पाटील (अहमदपूर), बाळासाहेब पाटील (कराड उत्तर), राजेश नरसिंग पाटील (चंदगड) यांचा समावेश आहे. तर काँग्रेसकडून ४ पाटील निवडून आले ज्यामध्ये ऋतुराज पाटील (कोल्हापूर दक्षिण), कुणाल पाटील (धुळे), माधवराव पाटील जवळकर (हदगाव), पी एन पाटील सडोलीकर (करवीर) यांचा समावेश आहे.
शिवसेनेकडून ६ पाटील निवडून आले ज्यामध्ये गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण), किशोर पाटील (पाचोरा), चिमणराव पाटील (एरंडोल), राहुल पाटील (परभणी), शहाजी बापू पाटील (सांगोला), कैलास पाटील (उस्मानाबाद) यांचा समावेश आहे. तर भाजपकडून चंद्रकांत पाटील (कोथरुड), राधाकृष्ण विखे पाटील (शिर्डी), रवीशेठ पाटील (पेण), राणा जगजितसिंह पाटील (तुळजापूर), संतोष दानवे पाटील (भोकरदन), संभाजी निलंगेकर पाटील (निलंगा) या ६ पाटलांचा समावेश आहे.
मनसेचे राजू (प्रमोद) पाटील (कल्याण ग्रामीण), बविआचे राजेश पाटील (बोईसर) आणि अपक्ष, चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर) आणि राजेंद्र पाटील यड्रावकर (शिरोळ) हे निवडून आले.
७ पवारांनी मारली बाजी-
राजेश पवार (भाजप)-नायगाव, नितीन पवार (राष्ट्रवादी)-कळवण, अशोक पवार (राष्ट्रवादी)-शिरुर, अजित पवार (राष्ट्रवादी)-बारामती, रोहित पवार (राष्ट्रवादी)-कर्जत जामखेड, लक्ष्मण पवार (भाजप)-गेवराई, अभिमन्यू पवार (भाजप)-औसा हे ७ पवार आडनावाचे आमदार निवडून आले आहेत.
विधानसभेत दिसणार ११ संजय-
संजय सावकारे (भाजप)- भुसावळ, संजय गायकवाड (शिवसेना)-बुलडाणा, संजय रायमूलकर (शिवसेना)-मेहकर, संजय कुटे (भाजप)-जळगाव जामोद, संजय राठोड (शिवसेना)-दिग्रस, संजय शिरसाठ (शिवसेना)-औरंगाबाद पश्चिम, संजय केळकर (भाजप)-ठाणे, संजय पोतनीस (शिवसेना)-कलिना, संजय जगताप (काँग्रेस)-पुरंदर, संजय बनसोडे (राष्ट्रवादी)-उदगीर, संजय शिंदे (अपक्ष)-करमाळा हे ११ संजय विधानसभेत दिसणार आहेत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.