काल महाराष्ट्रात मतदानाची रणधुमाळी सुरु असताना एका फोटोने सोशल मिडिया गाजवले या फोटोमध्ये गावातील मतदार हे ट्रॅक्टर ट्रॉलींचा पुलाचा वापर करून मतदान करायला जाताना दिसत आहे. अनेकांना मतदानाचे कर्तव्य पूर्ण करा असा संदेश या फोटोतून लोकांनी दिला आहे. या प्रयोगाची नोंद केंद्रीय निवडणूक आयोगानेही घेतली.
बारामती तालुक्यातील कांबळेश्वर येथे विधानसभेच्या मतदानासाठी मतदारांना मोठी कसरत करावी लागत आहे. या परिसरात रविवारी झालेल्या १२० मिलिमीटर पावसामुळे मतदान केंद्रालाच तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. मतदान करण्यासाठी मुख्य रस्त्यावरून मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी झालेल्या चिखलामुळे चक्क ट्रॉलींच्या पायघड्या घालण्याची वेळ आली.
सांगवी परिसरातील कांबळेश्वर येथील ओढ्याला मुसळधार पावसामुळे पूर आला होता. बारामती परिसरात रविवारी रात्री आणि सोमवारी पहाटे जोरदार पाऊस झाला. त्यामुळे नीरा नदीला पूर आला आहे. या नदीच्या काठावरच कांबळेश्वर हे गाव आहे. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती.
मात्र, पावसामुळे शाळेच्या मैदानात गुडघ्यापर्यंत पाणी भरले होते. सकाळी पाऊस थांबला असला, तरी मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी या पाण्यातून जाणे अनेकांना शक्य नव्हते. त्यामुळे मतदानावर परिणाम होण्याची शक्यता होती. त्यामुळे ग्रामस्थ आणि मतदान अधिकाऱ्यांनी तातडीने निर्णय घेत गावातून ट्रक्टरच्या ट्रॉली जमा केल्या.
त्या एकमेकांना जोडत शाळेच्या प्रवेशद्वारापासून मतदान केंद्रापर्यंत सेतू तयार केला. या सेतूवरून जात दिवसभर मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. त्यामुळे या केंद्रात ६० टक्क्य़ांहून अधिक मतदानाची नोंद झाली.
या मतदान केंद्रावर ३५१ व ३५२ हे दोन बूथ आहेत. या दोन्ही बुथवर २ हजार १०० मतदार आहेत. सुदैवाने मतदाना दिवशी पावसाने उघडीप दिली असल्याने प्रत्येक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ट्रॉलींचा आधार घेऊन जातानाचे चित्र पाहायला मिळत होते.
मतदान केंद्राच्या परिसरात पावसाचे पाणी किंवा चिखल झालेल्या जिल्ह्यातील सुमारे चारशे ते साडेचारशे मतदान केंद्रांमध्ये विविध प्रयोग राबवून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.
आपल्याला हि माहिती पटल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..