गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने तापलेला राजकीय आखाडा मतदानानंतर आता शांत झाला आहे. राज्यात ६०% मतदान झाले आहे. महाराष्ट्राच्या २८८ मतदारसंघातील निकाल ईव्हीएममध्ये कैद झाला आहे.
२४ ऑक्टोबरला निकाल असल्याने सर्व उमेदवार, कार्यकर्ते यांना दोन दिवसांची विश्रांती मिळाली आहे. पण एकंदर ईव्हीएम बद्दलच्या चर्चा, एक्झिट पोलचे आकडे पाहता ईव्हीएमएममध्ये घोळ होऊ शकतो अशी अनेकांनी भीती व्यक्त केली आहे. मतदानानंतर ईव्हीएमचा प्रवास कसा असतो ते आपण पाहणार आहोत.
मतदानानंतर ईव्हीएम मशीन अशी केली जाते सील
मतदान केंद्रावर मतदानाची वेळ संपल्यानंतर सीमारेषेच्या आत असणाऱ्या सर्व मतदारांचे मतदान करुन घेतले जाते. शेवटच्या मतदाराचे मत करुन झाल्यानंतर मतदान केंद्रावरील अधिकारी सर्व उमेदवारांच्या पोलिंग बुथ एजंटच्या समक्ष ऐकून मतांची आकडेवारी सांगून ईव्हीएम मशीनवरील Close बटन दाबून मशीन बंद करतात.
त्यानंतर त्यामध्ये कुठलेही मत नोंदवता येत नाही. ही मशीन एका बॉक्समधे ठेवली जाते आणि निवडणुक आयोगाकडून देण्यात आलेली विशेष सुरक्षा सील लावून त्यावर शिक्का मारला जातो. त्यावर मतदान केंद्रावरील अधिकारी आणि पोलिंग बुथ एजंटची सही घेतली जाते.
सगळ्या मशीन स्ट्रॉंग रुममध्ये जमा
वेगवेगळ्या मतदान केंद्रांवरच्या सील केलेल्या ईव्हीएम मशिन्स मतदान केंद्र अधिकारी तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या स्ट्रॉंगरुममध्ये आणुन जमा करतात. स्ट्रॉन्गरुम ही अशी खोली असते जिला एकच दरवाजा असतो. त्या खोलीचे बाकीचे सर्व दरवाजे, खिडक्या सिमेंट विटांचे बांधकाम करुन बंद केल्या जातात. सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या समक्ष खोलीला कुलूप लावली जाते.
उपस्थित असणाऱ्या लोकांची नोंद केली जाते. खोली सील केल्यानंतर तिची चावी स्थानिक प्रांताधिकारी किंवा दंडाधिकारी यांच्याकडे देण्यात येते. या सगळ्या प्रक्रियेचे व्हिडीओ शूटिंग केले जाते. स्ट्रॉंग रुमच्या सुरक्षेची जबाबदारी आयएएस अधिकारी, पोलीस अधिकारी आणि केंद्रीय निमलष्करी दलाच्या जवानांकडे दिली जाते.
मतमोजणीच्या दिवशी काय होते ?
मतमोजणीच्या दिवशी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत व्हिडीओ शूटिंग करत स्ट्रॉंगरुमचे दरवाजे उघडले जातात. केंद्रीय निमलष्करी दलाच्या जवानांच्या मदतीने सर्व सील केलेल्या ईव्हीएम मशिन्स मतमोजणीच्या ठिकाणी आणल्या जातात. मतमोजणीच्या अर्धा तास आधी मतमोजणी केंद्राचे सील उघडले जाते. मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या उमेदवारांच्या प्रतिनिधींनाच त्याठिकाणी प्रवेश देण्यात येतो.
त्यांच्या समक्ष ईव्हीएम मशीनचे सील उघडले जाते. त्यावेळी कुठल्याही लॅपटॉप, मोबाईल, कॅमेरा अशा इलेक्ट्रॉनिक उपकरणांना बंदी घालण्यात येते. वायफाय बंद केले जाते. ईव्हीएम मशीन सुरु करुन सील कारतेवेळीचा मतदानाचा आकडा आणि आताचा आकडा पडताळला जातो.
प्रत्येक टेबलवर एक मशीन, एक मतमोजणी अधिकारी, उमेदवाराचा एक प्रतिनिधी नेमून मतमोजणी सुरु केली जाते. मतमोजणीच्या अनेक फेऱ्या होतात. साधारण प्रत्येक फेरीला अर्धा-पाऊण तास लागतो. शेवटी EVM, VVPAT, पोस्टल मते मोजल्यानंतर अंतिम निकाल घोषित केला जातो.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.