राजकारण म्हणलं की महत्वाकांक्षा आल्या. किंबहुना महत्वाकांक्षेशिवाय राजकारण करण्याला अर्थच नाही असं मानलं जातं. त्यामुळे आपण अनेकदा बघितले असेल राजकारणात एकमेकांचे सख्खे भाऊ, नातेवाईक, वडील-मुलगा किंवा भाऊ बहीण एकमेकांचे प्रतिस्पर्धी असतात.
राजकारणामुळे नात्यांमध्ये दरी निर्माण होते. लोक एकमेकांपासून दूर जातात. एकमेकांचे तोंडही बघत नाहीत. पण बीडच्या राजकारणात याउलट परिस्थिती आहे. विधानसभा निवडणुकीत एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे उमेदवार एकाच घरात राहत असल्याचा अपवाद आपल्याला बघायला मिळतो.
एकमेकांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राहतात एकाच छताखाली
बीडच्या राजकारणातील हे प्रतिस्पर्धी आहेत जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर हे काका पुतणे !विधानसभा निवडणुकीत बीड मतदारसंघात दोघांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून संदीप क्षीरसागर हे उमेदवार आहेत. निवडणुकीच्या प्रचारात दोघेही दिवसभर एकमेकांवर टीका, आरोप करत असले तरी दोघेही संध्याकाळी एकाच घरात येतात. बीडमध्ये नगर रोडला असणारे त्यांचे घर बीडच्या राजकीय घडामोडींचे प्रमुख केंद्र बनले आहे.
एकाच घरातील दोघे एकमेकांचे विरोधक कसे झाले ?
जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीत असताना मागे झालेल्या बीड नगरपालिका निवडणुकीवेळी जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर यांच्यात मतभेद निर्माण झाले. त्यावेळी संदीप क्षीरसागरांनी काकू नाना आघाडीच्या माध्यमातून जयदत्त क्षीरसागर यांना चांगलीच टक्कर देऊन २१ नगरसेवक निवडून आणून बीडच्या राजकारणात खळबळ माजवली होती.
तेव्हापासून राष्ट्रवादीने संदीप क्षीरसागर यांच्यासारख्या तरूण चेहऱ्याला ताकत दिली. विधानसभा निवडणुकीच्या आधी जयदत्त क्षीरसागरांनी शिवसेनेत प्रवेश केला. बीडच्या या लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
बीडचे क्षीरसागर कुटुंब
बीडच्या राजकारणात क्षीरसागर कुटुंबाचा वरचष्मा राहिलेला आहे. क्षीरसागर कुटुंबात चार भाऊ आणि त्यांच्या मुलांची मिळून दहाजणांची कुटुंबे एकाच घरात राहतात. त्यांच्या घराला ये-जा करण्यासाठी दोन मार्ग आहेत. त्यांच्या हाताखालचे कर्मचारीही वेगवेगळेच आहेत.
त्यांचे टेलिफोनदेखील वेगवेगळे आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने त्यांचे पक्ष, कार्यकर्ते आणि समर्थकही वेगवेगळे आहेत. मात्र त्यांचा स्वयंपाक एकाच ठिकाणी केला जातो हे विशेष आहे. त्यांच्या गाड्यादेखील एकाच पार्किंगमध्ये उभ्या केल्या जातात.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.