लोकसभा निवडणुकीपासून दूर राहिलेल्या मनसेने विधानसभा निवडणुकीत उडी घेतली आहे. राज ठाकरे हे ताकतीने प्रचारात उतरले असून ते ठिकठिकाणी सभा घेत आहेत. मनसे या निवडणुकीसाठी आघाडीत जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण मनसेने आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले. मनसेने अधिकृत आघाडी केली नसली तरी राज्यात अनेक ठिकाणी मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची छुपी आघाडी झाल्याचे चित्र आहे.
सुरुवातीला पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात उभे असलेल्या मनसेच्या किशोर शिंदे यांना आघाडीने पाठिंबा
दिला. त्यानंतर ठाण्यात देखील राष्ट्रवादीच्या उमेदवाराने अर्ज वापस घेत मनसेला पाठिंबा जाहीर केला होता. तर नाशिकमध्ये मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी देखील आपला अर्ज वापस घेत राष्ट्रवादीच्या बाळासाहेब सानप यांना पाठिंबा जाहीर करत आघाडीची एकप्रकारे परतफेड केली होती.
मनसेने राज्यात अनेक ठिकाणी आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. ठाण्यासह कल्याण ग्रामीण मतदारसंघातही राष्ट्रवादीच्या उमेदवारानं अर्ज मागे घेतला. त्यामुळे ठाणे शहरात भाजप मनसेत मुकाबला होत आहे. तर कल्याण ग्रामीणमध्ये मनसे-शिवसेना यांच्यात थेट लढत पाहायला मिळत आहे.
पुण्यात ३ तर पिंपरी चिंचवडमध्ये ३ ठिकाणी मनसेचा आघाडीला पाठिंबा-
मनसेने पुण्यात कसबा, हडपसर, पुणे कँटोन्मेंट आणि शिवाजीनगरमध्ये स्वबळावर तर कोथरूडमध्ये आघाडीच्या पाठिंब्याच्या बळावर उमेदवार उभे केले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शहरातील पर्वती, खडकवासला आणि वडगाव शेरी मतदारसंघांमध्ये मात्र उमेदवार दिले नव्हते. या ३ मतदारसंघात आता मनसेने राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केला आहे.
पर्वती, खडकवासला आणि वडगाव शेरी मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मनसेने सक्रिय पाठिंबा दिला आहे. याशिवाय पिंपरीत राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराला, तर चिंचवड आणि भोसरीमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्षांनाही मनसेने अधिकृत पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या मतदारसंघातही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मनसेचे पाठबळ मिळणार आहे.
पुण्यात राष्ट्रवादी लढवत असलेल्या ४ पैकी ३ ठिकाणी मनसेने पाठिंबा दिला आहे. फक्त हडपसर मतदारसंघात भाजप- राष्ट्रवादी आणि मनसे यांच्यात लढत होणार आहे. भाजप-शिवसेनेविरोधात सक्षम विरोधी पक्ष निर्माण करण्याच्या प्रयत्नांचे पाऊल म्हणून या जागांवर राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याचे मनसेचे नेते बाबू वागसकर यांनी सांगितले.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.