नागपूरचे हिवाळी अधिवेशन जरी थंडीच्या काळात येत असले तरी अनेकदा या अधिवेशन काळातील विरोधी बाकावरील सदस्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय वातावरण गरमच असते. याकाळात मोर्चे, निदर्शेने, उपोषण, घेराव, शिष्टमंडळाच्या बैठकी यामुळे अधिवेशनात सरकारला घाम फुटतो.
नुकताच पावसाळा सामाऊन गेला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या विविध मागण्या, विदर्भातील लोकांच्या मागण्यांची त्यात भर असल्यामुळे सरकारची कसोटी लागते. २००५ सालचे नागपूर हिवाळी अधिवेशन अशाच कारणामुळे गाजले होते.
२००५ सालचे नागपूर हिवाळी अधिवेशन
आघाडी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत येऊन एकच वर्ष झाले होते. पावसाळ्यात झालेल्या प्रलयंकारी अतिवृष्टीमुळे कराड, सांगली, कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्र प्रभावित झाला होता. सहाग्रहा अध्यक्षांच्या दालनात उभे राहून शिवीगाळ केल्याप्रकरणी एकनाथ खडसे, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार या भाजप आमदारांचे निलंबन करण्यात आले होते.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने जोर पकडला होता. भारतीय जनता पक्षाने जवळपास दिड लाख लोकांचा मोर्चा नागपूर हिवाळी अधिवेशनावर आणला होता. अशा वेगवेगळ्या विषयांनी २००५ चे हिवाळी अधिवेशन गाजले होते.
…आणि सभागृह जळता जळता वाचले !
अकोल्यातील तेव्हाचे शिवसेना आणि आताच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते गुलाबराव गावंडे प्रत्येक अधिवेशनात सावकारी प्रथेच्या विरोधात आक्रमक असायचे. सावकारी विरोधी कायदा झालाच पाहिजे अशी त्यांची आग्रही मागणी असायची. २००५ च्या हिवाळी अधिवेशनातही गावंडे आक्रमक होते. या अधिवेशनात जर सावकार विरोधी कायदा झाला नाही तर आपण सभागृहत आत्मदहन करू असा इशारा त्यांनी दिला होता.
त्या दिवशी गावंडे विधानसभेत आले. प्रश्नोत्तराचा तास सुरु असताना उभे राहून त्यांनी बोलायला सुरुवात केली. पण अध्यक्षांनी त्यांनी खाली बसण्याची सूचना केली. त्यामुळे रागाचा पारा चढलेले गावंडे थेट मोकळ्या जागेत येऊन घोषणा द्यायला सुरुवात केली. त्याचवेळी त्यांनी अचानक जॅकेटमध्ये आणलेल्या रॉकेलच्या बाटल्या काढून अंगावर ओतून घेतल्या. खिशातून लायटर बाहेर काढला. सभागृहात एकच कल्लोळ झाला.
त्यावेळी संसदीय कार्यमंत्री असणाऱ्या हर्षर्धन पाटलांनी धाव घेऊन गावंडेंच्या हातातील लायटर हिसकावून घेतला आणि त्यांना घट्ट पकडून ठेवले. सभागृहात सगळे लाकडी फर्निचर असल्यामुळे मोठा धोका टळला. या कृत्याबद्दल गावंडेंचे अधिवेशन काळापुरते निलंबन करण्यात आले.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.