अटलबिहारी वाजपेयी यांच्या महाराष्ट्राच्या संबंधाने अनेक किस्से लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत. नागपूरच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयासोबत जनसंघाच्या स्थापनेपूर्वीपासून त्यांचा संबंध होता. २००३ मध्ये मुंबईच्या भाईंदरमधील रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीमध्ये अटलबिहारी वाजपेयींच्या हस्ते हापूस आंब्याचे रोपटे लावण्यात आले होते.
ते झाड मोठे झाल्यावर त्याच आंब्याचे दोन-तीन डझन आंबे जून २०१८ मध्ये दिल्लीला त्यांच्या घरी पाठवण्यात आले होते. अशा अनेक आठवणी आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांची अशीच एक मजेशीर आठवण आहे.
अपक्ष उमेदवारासाठी अटलबिहारींनी केला मेटॅडोरने प्रवास
१९७२ च्या विधानसभा निवडणुकीत जामनेर मतदारसंघात काट्याची लढत होती. काँग्रेसने मतदारसंघाबाहेरील व्यक्तीला उमेदवारी दिल्याने पूर्वीचे आमदार नारायण पाटील यांनी अपक्ष अर्ज भरला होता. जनसंघाने त्यांना केवळ पाठिंबाच दिला नाही, तर त्यांच्या प्रचारासाठी अटलबिहारी वाजपेयींची सभा घ्यायचे ठरले.
अटलबिहारींनी जामनेरमध्ये येऊन सभा घेतली. जामनेरची सभा संपवून ते औरंगाबादला निघाले. पण तेव्हा कुणाकडेच चारचाकी वाहन नव्हते. शेवटी मेटॅडोरवाल्याला १०० रुपयांचं भाडं देऊन अटलबिहारी त्यात बसून औरंगाबादला आले. विशेष म्हणजे नारायण पाटील त्या निवडणुकीत विजयी झाले.
…जेव्हा अटलबिहारी वाजपेयींच्या हातात कार्यकर्त्यांनी केळाचा घड दिला !
जामनेरमधील नारायण पाटलांच्या सभेसाठी आलेल्या अटलबिहारी वाजपेयींसोबत त्यावेळी एक गमतीदार प्रसंग घडला होता. सभा आटोपून वाजपेयींना चहापाणी करण्यासाठी फ्रुट सेल सोसायटी कार्यालयामध्ये नेण्यात आले. त्यावेळी वाजपेयीनीं “हे कशाचे कार्यालय आहे आणि इथे काय मिळते” अशी विचारणा केली.
त्यावेळी त्यांना फळविक्री केंद्राचे कार्यालय असे सांगण्यात आले. त्यावर अटलबिहारी वाजपेयींनी “जळगावच्या केळी प्रसिद्ध आहेत, मला केळीच खाऊ घाला” म्हणताच कार्यकर्ते पळतच गेले आणि केळांचा अख्खा घडच आणून वाजपेयींच्या हातात आणून ठेवला. वाजपेयी तोच घड घेऊन मेटॅडोरने औरंगाबादला रवाना झाले.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.