भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघादरम्यान पुण्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. पहिल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला होता. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना पुन्हा एकदा धावांचा डोंगर उभारला आहे. या सामन्यात पहिल्या दिवशी मयंक अग्रवालने शतक झळकावत भारताला जबरदस्त सुरुवात करून दिली.
त्यानंतर विराट कोहली आणि अजिंक्य राहणे यांनी डाव सांभाळला. आज खेळ सुरु झाल्यानंतर रहाणे ५९ धावा करून बाद झाला. त्यानंतर कोहली आणि जडेजाने भारताला धावांचा डोंगर उभा करून दिला. या सामन्यात विराट कोहलीने द्विशतक झळकावत आपला रेकॉर्डचा धडाका कायम ठेवला.
विराट कोहलीला या वर्षात आपल्या करिअरला साजेशी खेळी करता आली नव्हती. या वर्षात कोहलीने आज पहिलं शतक झळकावले. या वर्षात भारतीय संघ चार कसोटी सामने खेळला. या चार कसोटी सामन्यांमध्ये कोहलीने दोन अर्धशतके झळकावली. या चार सामन्यांमध्ये कोहलीची सर्वाधिक धावसंख्या ७६ होती.
या सामन्यात विराट कोहलीने आपल्या कसोटीमधील ७ हजार धावा देखील पूर्ण केल्या. या सामन्यात कोहलीने आपले कसोटीमधील २६ वे शतक देखील पूर्ण केले. तसेच कोहली कर्णधार म्हणून ४० आंतरराष्ट्रीय शतके काढलेला पहिला भारतीय बनला आहे. कसोटीत कर्णधार म्हणून १९वे शतक होते.
द्विशतक झळकावत केला विक्रम-
कोहलीने या सामन्यात आपल्या टेस्ट करिअरमधील ७ वे द्विशतक झळकावले. या द्विशतकासह कोहली भारताकडून टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतक झळकावणारा फलंदाज बनला आहे.
यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि सेहवाग यांच्यासह कोहलीने ६ द्विशतक झळकावले होते. त्याने या दोघांना मागे टाकत हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. कोहलीने या डावात आपल्या कारकिर्दीतील सर्वाधिक धावसंख्या देखील उभारली. भारताने डाव घोषित केला तेव्हा कोहली २५४ धावांवर नाबाद होता.
भारताने आपला डाव ५ बाद ६०१ धावांवर घोषित केला. या डावात भारताकडून कोहलीने सर्वाधिक २५४ धावा केल्या. मयंक अग्रवाल १०८, चेतेश्वर पुजारा ५८, अजिंक्य रहाणे ५९ धावा आणि रवींद्र जडेजाने फटकेबाजी करत ९१ धावांची खेळी केली.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.