EVM मशीनच्या बाबतीत अनेक चर्चा आपल्या कानावर पडत असतात. ईव्हीएम मशीन सोबत छेडछाड करुन निवडणुकीचे निकाल बदलवले जात असल्याच्या आरोपांवरुन विरोधकांनी अनेकदा वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्वी विरोधात असणारे ईव्हीएमला विरोध करत होते, पण तेच लोक सत्तेत आल्यावर आज ईव्हीएमचे समर्थन करत आहेत.
ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्याव्यात अशी मागणी होते. ईव्हीएम बंद केल्या नाहीत तर निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचीही भाषा केली गेली. पण सरकारने ईव्हीएमचा मुद्दा रेटून पुढे आणला. या सगळ्याच्या केंद्रस्थानी असणारी ईव्हीएम मशीन भारतात कशी आली जाणून घेऊया…
कशी आली ईव्हीएम मशीन भारतात ?
भारतात पूर्वी बॅलेट पेपरवर मतदान व्हायचे. बॅलेट पेपरवरील मतमोजणीसाठी वेळ लागायचा. तसेच मतमोजणीत पारदर्शकपणाचा प्रश्न असायचा. ही प्रक्रिया सुलभ व्हावी, कमी वेळ लागावा आणि त्यात पारदर्शकपणा असावा यासाठी १९७७ मध्ये त्यावेळचे मुख्य निवडणूक आयुक्त एस.एल.शकधर यांनी मतदान आणि मतमोजणीसाठी इलेक्ट्रॉनिक मशीनची कल्पना समोर आणली.
त्यानंतर १९७९ मध्ये पहिल्यांदा Proto-Time EVM मशीन बनवण्यात आली आणि १९८० मध्ये Electronic Corporation of India आणि Bharat Electronic Ltd यांनी मशीन सादर केली. ६ ऑगस्ट १९८० ला निवडणुक आयोगाने सर्व राजकीय पक्ष प्रतिनिधींना बोलावून त्यांच्यासमोर EVM मशीनचा प्रयोग सादर केला.
केरळमध्ये पहिल्यांदा वापर
१९८१ मध्ये भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेडने EVM मशिन्स बनवायचा प्रस्ताव केला. मे १९८२ मधील केरळच्या परुर या विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास ५० मतदान केंद्रामध्ये EVM चा पहिला वापर करण्यात आला. त्यानंतर १९८२ मध्ये देशातील ११ विधानसभा मतदारसंघामध्ये EVM वापरण्यात आली.
EVM पासून व्हीव्हीपॅट पर्यंत
१९८४ मध्ये लोकप्रतिनिधित्व कायद्यामध्ये दुरुस्ती झाल्यानंतर मार्च १९८९ पासुन EVM वापर सुरु झाला. १९९९ मध्ये EVM देशातील निवडणुकांमध्ये वापरण्याबाबत तज्ञांनी सूचना मांडली. तेव्हापासून चार लोकसभा निवडणुकीत EVM वापरण्यात आली. EVM च्या बाबतीत वेगवेगळे आरोप झाल्यानंतर मे २०१७ नंतर EVM सोबत VVPAT वापरण्यास सुरुवात झाली.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.