इथल्या फोटोत जे झाड दिसतंय, त्याखाली पुण्याच्या नागरी व्यवस्थेची कार्यक्षमता, टेक्नॉलॉजीतली प्रगती, स्मार्टसिटीपण, जीडीपीमधलं-देशातलं-राज्यातलं स्थान वगैरे गोष्टी दबल्या आहेत. काही दबून गुदमरल्या. काही गुदमरून मेल्या.
हे घडलंय बुधवारच्या संध्याकाळी अफाट गर्दीच्या वेळी भर टिळक रोडवर खजिना विहिरीच्या समोर. इथं पावसानं केवळ एक झाड कोसळून त्याखाली सापडून पीएमटीच्या बसचालकाचा मृत्यू झाला, असं मानलं, तर प्रश्नच संपले.
हा बसचालक संध्याकाळी सात-साडेपासून बसमध्ये अडकून तडफडत होता. तास-पाऊण तास तडफड चालली. नंतर सारं काही शांत झालं. जीव गेल्यावर तास-दीड तासांनी क्रेन आली. त्या आधी आलेल्या अग्निशामक दलाच्या गाड्या, रेस्क्यु व्हॅन सारं सारं साफ फेल ठरलं. भर टिळक रोडवर, जिथून अख्खं पुणं कवेत घेता येतं, तिथं एकाचा तडफडत बळी गेला. डोकं सुन्न व्हावं, बधीर होऊन जावं एेकून…वाचून…
पण, सुन्न होऊन चालणार नाही. बधीर तर अजिबातच नाही. ज्यांच्यावर नागरी व्यवस्थेची प्रमुख जबाबदारी आहे, त्या यंत्रणेला आधीच बधीरपण आल्याचं दिसतं आहे. नागरीकांचं बधीरपण यंत्रणेला आणखी सोयीचं. त्यामुळं प्रश्न विचारले पाहिजेत…यंत्रणेला जाग आणण्यासाठी.
ज्यांना आरोप-प्रत्यारोपाचं गलिच्छ राजकारणच खेळायचं आहे, त्यांनी ते खुश्शाल खेळावं. आज बळी गेलेल्या पीएमटी चालकावरून राजकारण करावं. परवा ओढ्यात वाहून गेलेल्यांवरून करावं. भिंती कोसळून बळी गेलेल्यांवरून करावं.
प्रश्न त्यांनी विचारावेत, ज्यांना तळमळ आहे. आस्था आहे. अप्रुप आहे आणि काळजीही. लक्षात घ्या, यावर्षीच्या पावसाळ्यात पुण्यात पन्नासवर बळी गेलेत.
आज प्रश्न विचारले नाहीत, तर कधी झाडाखाली, कधी रस्ता ओलांडताना, कधी रस्त्यांवर आलेल्या ओढ्यांना, कधी कुठल्या वाहनाखाली, कधी होर्डिंगखाली नवा बळी ठरलेला… प्रश्न आहेत महापालिकेच्या प्रशासनाला, आमच्या भल्यासाठी म्हणून निवडून दिलेल्या नगरसेवकांना, आमच्या कल्याणासाठी राज्यात-देशात कारभार व्हावा म्हणून निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनाः
1. पुण्यात जगातलं सर्वोत्तम तंत्रज्ञान आहे. संरक्षण खात्याचं सदर्न कमांड आहे. शेकडो दशके हवामान खात्याची व्यवस्था आहे. मग, पाऊस पडणार याचा अंदाज कुणालाच कधी येत नाही का? अंदाज येत असेल, तशी माहिती असेल, तर महापालिकेची यंत्रणा आधी स्वतः सतर्क होऊन नागरीकांना सतर्क करते का?
2. भूमिगत गटर योजनेच्या नावाखाली भूमिगत ओढे बांधले आहेत का? सातारा रोड, सिंहगड रोड, कर्वे रोड या रस्त्यांवरून पावसाच्या पाण्याचे लोंढेच्या लोंढे प्रचंड वेगाने वाहतात. मग इतके वर्षे बांधलेल्या गटारांमधून काय वाहते? पावसाळी पाणी वाहून नेण्यासाठी स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंट नावाची व्यवस्था असते. ती पुण्यात आज नेमकी कुठल्या कोपऱयात अस्तित्वात आहे?
3. धोकादायक ठरणाऱया झाडांच्या फांद्यांची पावसाळ्यापूर्वी छाटणी करणारी यंत्रणा यावर्षी कुठे काम करत होती?
4. आपत्कालिन नावाचा कक्ष महापालिकेत अस्तित्वात आहे का? असेल, तर या कक्षानं किती लोकांना काय मदत केली यंदाच्या पावसाळ्यात?
5. बेकायदेशीर आणि चुकीची बांधकामे करणारे, त्या बांधकामांकडे दुर्लक्ष करणारे या दोन्ही घटकांवर कधी आणि कोणती कारवाई होणार?
6. फुटपाथ आणि रस्ते यांची कामं जिथं तिथं बेजबाबदारपणे अर्धवट पडून आहेत. त्याची जबाबदारी कोणाची?
7. टेकड्यांची लागलेली वाट, त्यांची होणारी धूप असं नवं संकट भविष्यात ओढवून ठेवलेलं आहे, याची जाणीव आहे का? असेल, तर काय उपाययोजना करत आहात?
8. वेगवेगळ्या टॅक्समधून जे हजारो रुपये सामान्य नागरीक भरतो, ते जातात कुठे? आंबिल ओढ्यात की ट्रॅफिकच्या धुरात?
9. हजारो पुणेकरांच्या रोजच्या जीवाशी रोज खेळ सुरू आहे, याचे किती गांभिर्य रोजच्या कारभारात आहे का?
10. एकाच यंत्रणेला सारे उपाय झेपणारे नसतील, तर नागरीकांना नॉलेज शेअरिंगसाठी, अनुभवाच्या अथवा अन्य मदतीसाठी आवाहन केलं आहे का? की नागरीकांनी स्वतःच ही मदत घेऊन दारात उभं राहावं?
-सम्राट फडणीस