निवडणुकीचा काळ म्हणजे लोकांच्या करमणुकीचा काळ ! लोकशाहीच्या या उत्सवात अनेक गमतीशीर प्रसंग घडत असतात. नेत्यांच्या प्रचारसभा, घोषणा, निवडणूक चिन्ह किंवा उमेदवाराच्या शारीरिक रुपाच्या संबंधाने अनेक प्रकारच्या गमतीजमती विरोधक आणि कार्यकर्ते करत असतात.
प्रसंगी विरोधी उमेदवाराबाबत अफवाही पसरवल्या जातात. १९९० च्या विधानसभा निवडणुकीत एक नेता अशाच एका गमतीशीर अफवेमुळे पराभूत झाला होता. पाहूया महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमधील एक फ्लॅशबॅक…
…त्यांच्या काळ्या चष्म्यातून आतले सगळे दिसते बरं का !
१९९० च्या विधानसभा निवडणुकीतील वाशीम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघात शिवसेनेचे गुलाबराव गावंडे आणि काँग्रेसचे बाबासाहेब धाबेकर यांच्यात झालेली लढत आरोप-प्रत्यारोपांपेक्षा अफवेमुळेच जास्त गाजली. त्यावेळी बाबासाहेब धाबेकरांना काळा चष्मा घालायची आवड होती. विरोधकांनी धाबेकरांच्या या चष्म्यावरच निवडणूक केंद्रित केली.
“त्यांच्या काळ्या चष्म्याला X-रे काचा आहेत, त्यातून समोरच्याचे आतले सगळे दिसते” अशा अफवा मतदारसंघात पसरल्या. या अफवेमुळे मतदारसंघातील महिलांनी धाबेकरांच्या सभेला जायचंच बंद केले. धाबेकर या अफवेमुळे त्रस्त झाले. शिवसेनेच्या गुलाबराव गावंडेंनी याचा पुरेपूर फायदा घेतला. परिणामी या निवडणुकीत बाबासाहेब धाबेकरांचा पराभव झाला. तेव्हापासून प्रत्येक विधानसभा निवडणुकीत धाबेकरांच्या काळ्या चष्म्याची अफवा चांगलीच रंगते.
काळ्या चष्म्यामुळे हा नेता बनला आमदार
एका बाजूला बाबासाहेब धाबेकरांना काळ्या चष्म्याच्या अफवेमुळे पराभव पत्करावा लागला असला, तरी नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदारसंघात काळ्या चष्म्याने एका नेत्याला आमदार केल्याचा प्रसंग घडला होता. वास्तवात झालं असं की, १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुख बंडखोरी करुन काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात उभे राहिले होते. त्यांना “चष्मा” हे निवडणूक चिन्ह मिळाले. त्यावेळी १९९४ मध्ये आलेल्या अक्षय कुमारच्या सुहाग चित्रपटातले “गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा” हे गाणं खूपच गाजलं होतं.
अनिल देशमुखांच्या संपूर्ण प्रचारकाळात या गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. ज्याच्या त्याच्या तोंडात चष्मा हे चिन्ह पोचले. या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेल्या तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांच्या अनिल देशमुखांच्या कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळामुळे त्यांना आपली सभा रद्द करावी लागली होती. अनिल देशमुख या निवडणुकीत विजयी झाले आणि युतीच्या सरकारमध्ये राज्यमंत्रीही बनले.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.