एकीकडे आरेच्या जंगलाची कत्तल सुरु असताना सर्व लोकांना या समाजाबद्दल माहिती मिळणे आवश्यकच आहे. असाही एक समाज आहे जो फक्त पर्यावरण रक्षणासाठी झगडतो आणि जगतो सुध्दा मोठ मोठ्या सिने अभिनेत्यांना देखील यांनी सोडले नाही आहे.
शुष्क वाळवंटासाठी प्रसिद्ध राजस्थानात वन्यप्राणी आणि वृक्षवेलींच्या रक्षणाचं काम बिष्णोई समाज करतो. जंगलातल्या प्राण्यांच्या सुरक्षेसाठी आणि झाडं जगवण्यासाठी ते प्राणांची बाजी लावू शकतात. बिश्नोई म्हणजे बीस आणि नऊ यांचे मिश्रण. वीस आज्ञा आणि नऊ तत्वे.
गुरु जांभेश्वर यांनी समाजास ह्या २९ बाबींचे पालन अनिवार्य केले आणि हा समाज बिश्नोई म्हणून ओळखला जाऊ लागला. सलमान खानच्या काळवीट हत्या खटल्यात याच समाजाचे लोक फिर्यादी आणि साक्षीदार होते म्हणूनच तो ही केस हरला असे म्हणणे चुकीचे होणार नाही.
कारण हा समाज प्राण्यांना देव मानतो, त्यातही जे गवत, पानं खाऊन जगतात ते यांना पूज्य आहेत. निसर्ग रक्षण आणि पर्यावरण संतुलन ही यांची आद्य कर्तव्ये आहेत. बिश्नोई समाजातील लोक हे प्रामुख्याने राजस्थानच्या थार वाळवंटाच्या परिसरात आढळतात. निसर्गाविषयी असलेल्या प्रेमासाठी त्यांची खास ओळख आहे. झाडे वाचवण्यासाठी काही वर्षापूर्वी आपल्याकडे चिपको आंदोलन झाले होते, नुकतेच गुगलने त्याची दखल घेत डूडलही बनवले होते.
बिश्नोई समाजाने चिपको आंदोलनाहून श्रेष्ठ आणि गौरवशाली इतिहास अजमेरजवळील एका गावात घडवला होता. अमृतादेवी बेनिवाल या महिलेने आपल्या तीन मुली आणि पतीसह झाडे तोडायला आलेल्या राजा अभयसिंहाच्या सैन्यास विरोध केला आणि त्याकरिता प्राणाचे बलिदान दिले. ३६३ लोकांनी झाडांची कत्तल अडवण्यासाठी आपला जीव दिला होता.
ही १७८७ची गोष्ट आहे. असं जगाच्या पाठीवर कुठंही कधीही घडलं नाही. इतकं कमालीचं निसर्गप्रेम या समाजात होतं, आहे आणि भविष्यातही राहील. इंटरनेटवर हरणाच्या पाडसाला आपलं दुध पाजणाऱ्या एका बिश्नोई स्त्रीचा फोटो व्हायरल झाला होता तेंव्हा समाजाने तिला नावं न ठेवता तिची पाठराखण केली होती. सलमानच्या प्रकरणात त्याने सगळे प्रयत्न करूनही हा समाज बधला नाही की फुटलाही नाही.
बिष्णोई समाज केवळ राजस्थानपुरता मर्यादित नाही. राजस्थानसह हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातही बिष्णोई समाजाची माणसं राहतात.