आयरन लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदिरा गांधींचा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा प्रभाव होता. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण पुण्यातच झाले होते. इंदिरा गांधी पहिल्यांदा प्रधानमंत्री झाल्यानंतर काही वर्षातच राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या निवडीवरुन काँग्रेसमध्ये फूट पडली होती.
त्याच्याच परिणामी आणीबाणीनंतर महाराष्ट्रात काँग्रेस आय आणि रेड्डी काँग्रेस हे दोन गट उदयाला आले. अंतुलेंच्या पायउतरणानंतर वसंतदादा पाटलांना डावलून बाबासाहेब भोसलेंना मुख्यमंत्री करणे हा त्याचाच परिणाम होता.
पुढच्या विधानसभा निवडणुकीनंतर यशवंतराव चव्हाणांच्या पुढाकाराने या दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या आणि त्यांनी वसंतदादा पाटलांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन केले. पण दोन्ही काँग्रेसमधील कुरघोडीमुळे ते सरकार चालवायला अडचणी येऊ लागल्या. शेवटी शरद पवारांनी हे सरकार पडून पुलोदचे सरकार स्थापन केले. हा झाला इतिहास !
इंदिरा गांधी पुन्हा प्रधानमंत्री, महाराष्ट्र दौरा आणि तुळजाभवानी मंदिरातील प्रसंग
१९८० मध्ये इंदिरा गांधी पुन्हा एकदा सत्तेत आल्या आणि त्या प्रधानमंत्री बनल्या. त्यावेळी त्यांनी सर्व विरोधी सरकारे बरखास्त केली. त्यात महाराष्ट्रातील पुलोद सरकारही बरखास्त झाले. इंदिरा गांधींचा देशाच्या राजकारणात प्रचंड दबदबा वाढला होता. १९८२ मध्ये इंदिरा गांधी महाराष्ट्रात आल्या.
इंदिरा गांधी उस्मानाबाद दौऱ्यावर असताना त्या तुळजापूरला तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी गेल्या. विशेष म्हणजे देशाच्या प्रधानमंत्री असणाऱ्या इंदिरा गांधींनाही देवीच्या गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी परवानगी घ्यावी लागली होती. इंदिराजी मंदिरात देवीचे दर्शन करून ज्यावेळी बाहेर आल्या तेव्हा त्यांचे लक्ष मंदिराच्या शिखराकडे गेले.
मंदिराच्या शिखराला रंगरंगोटी करण्यात आल्याचे पाहून त्यांनी पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्याला बोलावले आणि “तुम्ही मंदिराचा प्राचीन चेहरामोहरा का बदलला ?” असा जाब विचारला. तेव्हा अधिकाऱ्याची पाचावर धारण बसली. तेव्हापासून मंदिराची मूळ ओळख कायम ठेवूनच इतर विकासकामे केली जातात.