महाराष्ट्र विधानसभा अवघ्या २ आठवड्यांवर येऊन ठेपल्या आहेत. आपापल्या मतदारसंघातील गणिते मांडून मधल्या काळात अनेक नेत्यांनी इकडून तिकडे पक्षांतरे केली आहेत. विविध पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या. एबी फॉर्मचे वाटप झाले. मोठे शक्तिप्रदर्शन करुन उमेदवारी अर्ज भरले गेले. निवडणुकीला रंग चढायला सुरुवात झाली आहे. कार्यकर्त्यांमध्ये पैजा लागल्या आहेत.
उमेदवारांना कधी एकदा विधानसभेत आमदार म्हणून निवडून जातोय याचे वेध लागले आहेत. या सगळ्या वातावरणात महाराष्ट्राच्या विधानसभेत ११ वेळा आमदार म्हणून निवडून गेलेल्या सर्वात ज्येष्ठ नेत्याने यंदाच्या यंदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे.
५४ वर्षे महाराष्ट्राच्या विधानसभेत घुमणारा आवाज यंदा ऐकायला मिळणार नाही
९४ वर्ष वय असणारे सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांनी प्रकृतीच्या कारणाने यंदाची विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी घोषित केले आहे. १९६२ पासून सर्वाधिक ११ वेळा त्यांनी सांगोला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
त्यांच्या या विश्वविक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे ते राज्यातील सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी मागच्या ५४ वर्षे महाराष्ट्राच्या विधानसभेत आपल्या करारी आवाजात शेतकरी कामगारांचे प्रश्न मांडले. मतदारसंघात आजही त्यांची प्रचंड क्रेझ आहे.
कोण असेल गणपतराव देशमुखांचा राजकीय वारसदार ?
गणपतराव देशमुखांनी निवडणूक लढणार नसल्याचे घोषित केल्यानंतर त्यांचे पुत्र चंद्रकांत देशमुख हे इच्छुक होते. परंतु शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी सांगोल्याचा जागेसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यानंतर भाऊसाहेब रुपनवर यांचे नाव घोषित करण्यात आले. भाऊसाहेब रुपनवर हे उद्योगपती असून सांगोल्यातील फॅबटेक शुगर इंडस्ट्रीचे मालक आहेत. पण शेकापच्या कार्यकर्त्यांनी गणपतरावांनीच निवडणूक लढवावी हा आग्रह कायम ठेवून रुपणार यांना विरोध केला.
कार्यकर्त्यांचा विरोध बघून अखेर त्यांची उमेदवारी बदलण्यात आली. सांगोला विधानसभा मतदारसंघातून शेकाप तर्फे गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ अनिकेत देशमुख हे निवडणूक लढवणार आहे. डॉ देशमुख यांनी शुक्रवारी अर्ज दाखल केला.
काँग्रेस-राष्ट्रवादीने सांगोल्यात शेकापच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. आपल्या कार्यकाळात गणपतराव देशमुखांनी मतदारसंघात अनेक विकासकामे मार्गी लावली. त्यांनी माघार घेतल्याने मतदारसंघातील त्यांना मानणारा वर्ग नाराज झाला आहे. तर उमेदवारी मध्ये बदल करीत नातवाला पुढे आणल्यामुळे मतदारसंघात उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे.
सांगोल्यात आता शिवसेनेचे उमेदवार शहाजीबापू पाटील आणि शेकापचे डॉ अनिकेत देशमुख यांच्यात लढत होणार आहे. तर दुसरीकडे सांगोल्यातून युतीमध्ये देखील बंडखोरी झाली आहे. भाजपाच्या इच्छुक राजश्री नागणे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. या आधी दीपक साळुंखे यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक अतितातीची होईल अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.