महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला विधानसभेसाठी मतदान होणार असून २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. काल भाजपने आपल्या १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केले आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह १२५ जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपने ५२ विद्यमान आमदारांना तिकीटं दिली आहेत. तर १२ महिलांना यंदा उमेदवारी दिली आहे.
भाजपच्या या यादीत एकनाथ खडसे, विनोद तावडे यांचे नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या दोघांचा पहिल्या यादीत समावेश होणे अपेक्षित होते. पण त्यांचे नाव नसल्याने सर्वांना धक्का बसला आहे. सोबतच प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे यांचेही नाव या यादीत नाहीये.
भाजपने आपल्या या यादीत अनेक आयारामांना संधी दिली आहे. अनेक विद्यमान आमदारांचे तिकीट या यादीत कापल्याचे चित्र आहे. विधानसभेसाठी युती करत असल्याची घोषणा भाजप-शिवसेनेतर्फे एका संयुक्त पत्राद्वारे करण्यात आली होती.
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीची अधिकृत घोषणा झाली असली तरी जागावाटप मात्र अजून जाहीर झालेलं नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या यादीबाबत उत्सुकता होती.
पुण्यात चार जागेवर बदलले उमेदवार-
भाजप सेना महायुतीची घोषणा झाल्यानंतर पुण्यातून सेनेला किती जागा मिळणार याबाबत उत्सुकता होती. पण भाजपने जाहीर केलेल्या यादीत पुण्यातील आठही जागेवर उमेदवार घोषित केल्यामुळे शिवसेनेला एकही जागा मिळणार नसल्याचे सिद्ध झाले आहे.
शिवसेनेला २ जागा मिळतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे लढणार असल्याचे निश्चित झाले. सध्याच्या आमदार मेघा कुलकर्णी यांचे तिकीट येथून कापण्यात आले असून प्रदेशाध्यक्ष स्वतः येथून लढणार आहेत.
४ ठिकाणी पुण्यातून उमेदवार बदलण्यात आले आहेत. कसबा, कोथरूड, पुणे कॅंटोन्मेंट आणि शिवाजीनगर या मतदार संघाचा यात समावेश असून शहराच्या महापौर मुक्ता टिळक यांना येथील आमदार गिरीश बापट हे खासदार झाल्याने कसबा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली असून कोथरूड मतदारसंघातून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवाजीनगर मतदारसंघातून आमदार विजय काळे यांच्या ऐवजी माजी खासदार अनिल शिरोळे यांचे चिरंजीव सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पुणे कॅंटोन्मेंटमध्ये माजी राज्य मंत्री दिलीप कांबळे यांच्या ऐवजी त्यांचे भाऊ सुनील कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तर हडपसर मधून योगेश टिळेकर, खडकवासला मधून भीमराव तापकीर, पर्वती मधून माधुरी मिसाळ तर वडगाव शेरीमधून जगदीश मुळक यांना उमेदवारी कायम ठेवली आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.