यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत “तुरुंग” हा विषय अनेकदा चर्चेत आला आहे. सोलापूरच्या सभेत अमित शहांनी “शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले” असा प्रश्न विचारल्यानंतर शरद पवारांनी “तुमच्यासारखं तुरुंगात गेलो नाही” असे खोचक उत्तर दिले होते. जळगावच्या गाजलेल्या घरकुल घोटाळ्यात सुरेश जैनांसह ३८ लोकांना तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. चिदंबरम यांची तिहार तुरुंगात रवानगी झाली आहे.
राज्य शिखर बँक गैरव्यवहाराप्रकरणी ७१ संचालकांच्या ED चौकशीचा विषय गरम आहे. मोहोळचे आमदार रमेश कदम यांनी तुरुंगातूनच निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. एकंदर तुरुंग हा विषय विधानसभा निवडणुकीत चर्चेचा विषय आहे. अशामध्ये महाराष्ट्राच्या एका माजी मुख्यमंत्र्यांच्या तुरुंगात झालेल्या साखरपुड्याची एक जुनी आठवण आम्ही आपणाला सांगणार आहोत.
कुणाच्या ध्यानीमनी नसताना इंदिरा गांधींनी केले यांना मुख्यमंत्री
आज आपण बोलतोय महाराष्ट्राचे अल्पकाळ मुख्यमंत्री राहिलेल्या बाबासाहेब भोसले यांच्याबद्दल ! सिमेंट घोटाळ्यांच्या आरोपांमुळे मुख्यमंत्री बॅरिस्टर अ.र.अंतुले यांना जानेवारी १९८२ मध्ये राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी वसंतदादा पाटीलच पुढचे मुख्यमंत्री होतील अशा चर्चा होत्या.
परंतु तत्कालीन राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा इंदिरा गांधींनी अचानकपणे बाबासाहेब भोसले यांचे नाव निश्चित केले. ही निवड इतकी अनपेक्षित ठरली की खुद्द बाबासाहेब भोसलेंनाही यावर विश्वास बसला नव्हता. बाबासाहेब भोसले जानेवारी १९८२ ते फेब्रुवारी १९८३ या तेरा महिन्यांच्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.
तुरुंगात साखरपुडा झालेला आजपर्यंतचा एकमेव राजकीय नेता
बाबासाहेब भोसलेंचा जन्म साताऱ्यातील तारळे येथे सत्यशोधक कुटुंबात झाला. त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. तरुण वयात बाबासाहेबांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. सातारा, सांगली परिसरात त्यांनी ब्रिटिश विरोधी कारवायांत भाग घेतला. १९४१-४२ मध्ये त्यांना दिड वर्षांचा तुरुंगवास झाला. बाबासाहेब भोसले येरवडा तुरुंगात असतानाच त्यांचा साखरपुडा संपन्न झाला. स्वातंत्र्यसैनिक तुळशीदास जाधव यांची कन्या कलावती या त्यांच्या पत्नी होत.
तुळशीदास जाधवांनाही त्यावेळी येरवडा तुरुंगवास झाला होता. आपल्या मुलीचा साखरपुडा आपल्या डोळ्यांसमोर व्हावा ही त्यांची इच्छा होती. येरवडा तुरुंग अधिकाऱ्यांच्या देखरेखखाली बाबासाहेब भोसले आणि कलावती जाधव यांचा साखरपुडा पुण्याच्या येरवडा तुरुंगात पार पडला. बाबासाहेब तुरुंगातून बाहेर आल्यानंतर १९४५ मध्ये त्यांनी सध्या पद्धतीने विवाह केला.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.