नदी म्हणजे नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अशी तिची साधी व्याख्या आहे. तलाव, झरे किंवा बर्फाच्छादित प्रदेशातून नाडीची निर्मिती होते. अनेक गोड्या पाण्याचे छोटे झरे एकत्र मिळून नदीप्रवाह तयार होतो आणि हा प्रवाह समुद्राच्या दिशेने वाहत जाऊन मिळते. भारतातील सर्व नद्या पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे असणाऱ्या समुद्राला जाऊन मिळतात, परंतु भारतात एक नदी अशी आहे जी कुठल्याही समुद्राला मिळत नाही.
तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे ? इतके सारे पाणी घेऊन येणारी नदी जर समुद्राला मिळत नसेल तर मग एवढे पाणी जाते तरी कुठे ? चला तर मग जाणून घेऊया…
भारतात अशी कोणती नदी आहे जी समुद्राला जाऊन मिळत नाही ?
लुनी नदी ! राजस्थानच्या अजमेर जिल्यात असणाऱ्या अरवली पर्वतरांगेतील नागा पर्वतात उगम पावणारी ही नदी ना कुठल्या समुद्राला जाऊन मिळते ना कुठल्या नदीला जाऊन मिळते. ही नदी अजमेर जिल्ह्यातून वाहत जात राजस्थानच्या दक्षिण-पश्चिम भागातून गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात प्रवेश करते आणि ४९५ किमीचा प्रवास करुन ही नदी कच्छच्या वाळवंटातच लुप्त होऊन जाते.
एकतर राजस्थानमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याने लुनी नदीला पाणी कमीच असते, त्यामुळे नदीचा प्रवाह वाहत राहत नाही. तसेच राजस्थानचा मोठा भूभाग वाळवंटी असल्याने पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होते. कच्छच्या वाळवंटात प्रवेश करताना नदीचे पात्र रुंदावत जाते आणि हळूहळू नदीचे पात्र वाळवंटातच विलीन होऊन जाते. त्यामुळे ही नदी इथेच संपून जाते.
नदीच्या पाण्याची चव बदलत जाते
नागा पर्वतावर समुद्र सपाटीपासून ७७२ मीटर उंचावर उगम पावलेल्या लुनी नदीला तिचे नाव संस्कृतमधील लवणगिरी नावावरून पडले आहे. लवण म्हणजेच खारट. उगमाच्या १०० किलोमीटरच्या प्रदेशात लुनी नदीचा प्रवाह गोड्या पाण्याचा आहे.
इथपर्यंच्या नदीला सागरमती या नावाने ओळखले जाते. परंतु तिथून पुढे गेल्यानंतर बाडमेर भागात खऱ्या भूमीमुळे नदीचे पाणीही खरे बनत जाते. तिथूनच या नदीला लुनी नदी म्हणजे खारट नदी म्हणून ओळखले जाते.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्याकडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com इमेल आयडी वर पाठवू शकता.