शरद पवार हे बीड दौऱ्यावर असताना राष्ट्रवादीच्या मेळाव्यात पाच उमेदवार घोषित केले होते. स्वतः पवारांनी उमेदवारी जाहीर केल्याने या उमेदवारांची राज्यभर चर्चा झाली. पण आज राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. केज मतदार संघातून उमेदवारी जाहीर केलेल्या नमिता अक्षय मुंदडा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
दिवंगत लोकनेत्या डॉ. विमलताई मुंदडा यांच्या त्या सून आहेत. मुंदडा कुटुंब लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असून त्यांच्या उमेदवारीची घोषणा लवकरच होणार आहे. पक्षातील आमदार सोडून जात असताना आता पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे खुद्द पवारांनी जाहीर केलेला उमेदवारही पक्षातून जाणे हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
नमिता मुंदडा या उच्चशिक्षित चेहरा म्हणून जिल्ह्यात ओळखल्या जातात. नुकतंच नमिता यांनी एक फेसबुक पोस्टमधून त्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देतील असे संकेत दिले होते. त्यांच्या या फेसबुक पोस्टमधून राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पवार यांचे फोटो गायब झाले होते.
केज मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान आमदार संगीता ठोंबरे या आहेत. नमिता मुंदडा यांना केजमधून उमेदवारी मिळणार असल्याने आता संगीत ठोंबरे काय भूमिका घेणार याकडे लक्ष असणार आहे. दरम्यान संगीत ठोंबरे यांनी येथून उमेदवारी मिळावी म्हणून जोरदार प्रयत्न केले होते. पण त्यांना यश न आल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
नमिता या राज्याच्या मंत्री दिवंगत डॉ. विमल मुंदडा यांच्या सूनबाई आहेत. डॉ. मुंदडा यांनी भाजपमधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्या दोनदा भाजपच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर तीनदा त्यांनी विधानसभेत प्रवेश केला होता.
आघाडी सरकारच्या काळात दिवंगत डॉ. विमल मुंदडा यांनी मंत्रिपदही भूषवले होते. त्यांच्या निधनानंतर केजमधून नमिता यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, भाजपच्या संगीत ठोंबरे यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.