मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे आज (30 सप्टेंबर) पहाटेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. मुंबईतील गावदेवी येथील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत लवली. विजू खोटे यांच्या निधनामुळे सर्व सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
विजू खोटे यांचा जन्म 17 डिसेंबर 1941 मध्ये झाला. ‘या मालक’ या 1964 मध्ये प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटातून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. गेल्या 55 वर्षांपासून त्यांनी सिनेसृष्टीत अनेक भूमिका साकारल्या.
विजू खोटे यांनी ३०० हून अधिक मराठी-हिंदी चित्रपट आणि मालिकांमधून अभिनय केला आहे. त्यांनी असंख्य छोट्या भूमिका केल्या असल्या तरी त्यांचे अभिनय कौशल्य आणि संवादफेक अप्रतिम असल्याने त्या दर्शकांच्या कायम लक्षात राहिल्या. शोले चित्रपटातील त्यांची कालियाची भूमिका विशेष गाजली.
शोलेतील गब्बर जेव्हा तेरा क्या होगा, कालिया?, असे विचारतो तेव्हा कालिया घाबरत उत्तर देतो, ‘ स..स.. सरदार, मैने तो आपका नमक खाया हैं, सरदार’ हा संवाद अंत्यंत गाजला.
विजू खोटे यांचे वडील नंदू खोटे हे देखील अभिनेते होते. त्यांनी अनेक मूक चित्रपटांमध्ये काम केले होते. प्रसिद्ध अभिनेत्या दुर्गा खोटे या त्यांच्या बहिण होत्या. दुर्गा यांनी मराठीतील पहिला बोलपट अयोध्येचा राजा या चित्रपटात राणी तारामतीची भूमिका केली होती.
‘अंदाज अपना अपना’ मधील ‘रॉबर्ट’ ही व्यक्तीरेखा देखील विजू यांनी लोकप्रिय केली होती. त्यातील त्यांची ‘गलती से मिस्टेक हो गया’ हा डायलॉग आज देखील अनेकांच्या तोडी ऐकायला मिळतो. मराठी हिंदी चित्रपटांसोबत त्यांनी अनेक वर्षे नाटकांमध्ये देखील काम केले होते. छोट्या पडद्यावरील मालिकेत विजू यांनी आपल्या अभिनयाची छाप टाकली होती. ‘जबान संभाल के’ या मालिकेतील त्यांनी साकारलेली व्यक्तीरेखा रसिकांच्या स्मरणात आहे.
कालिया, गँगस्टर, डाकू, डॉनचा उजवा-डावा हात, विमा एजंट यासारख्या अनेक चित्रपटात त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. ‘भगतसिंग’ या चित्रपटात केवळ एका सीनसाठी काम करताना त्यांना कुठेही मानहानी झाल्याप्रमाणे वाटलं नाही.