हिंदीतल्या “नायक” चित्रपटातील एका दिवसासाठी मुख्यमंत्री झालेला अनिल कपूर असो किंवा मराठीतील “आजचा दिवस माझा” चित्रपटातील सर्वसामान्य माणसाला एका रात्रीत राजकीय वातावरणात न्याय मिळवून देण्यासाठी झटणारा सचिन खेडेकर असो; मुख्यमंत्रीपदाची ताकत काय असते ते या चित्रपटात आपल्याला जवळून बघायला भेटते.
सध्याच्या काळात मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरुन मोठा भाऊ-छोटा भाऊ, युती-आघाडी यांच्यातील अंतर्गत चढाओढ आणि त्यासाठी केले जाणारे राजकारण पाहून खरंच या पदाला एवढी राजकीय प्रतिष्ठा का दिली जाते हा प्रश्न पडतो. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात असेच एक मुख्यमंत्री होऊन गेले, ज्यांना केवळ १० दिवस म्हणून राज्याचा कारभार पाहता आला. त्यांचे नाव डॉ.परशुराम कृष्णाजी सावंत उर्फ बाळासाहेब सावंत !
महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेब सावंत नावाच्या नेत्याचा उदय
बाळासाहेब सावंत यांचा जन्म ६ जून १९०८ रोजी कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील मिऱ्या गावात झाला. पहिल्यापासूनच शेतीमधील प्रयोगाची त्यांना आवड होती. आपले शिक्षण झाल्यानंतर त्यांनी काही काळ शिक्षक म्हणून काम केले. कामगारांच्या प्रश्नांवर त्यांचा अभ्यास होता.
दरम्यान कायद्याचे शिक्षण घेऊन बाळासाहेब वकील झाले. ११ सप्टेंबर १९४६ रोजी पुण्यातील स्वस्तिक बंगल्यात काँग्रेस पक्षाच्या अंतर्गतच शंकरराव मोरेंच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या “शेतकरी-कामगार संघ”चे ते संस्थापक सदस्य होते. मे १९४७ मध्ये “इंटक”च्या स्थापनेतही बाळासाहेबांनी आपले योगदान दिले.
बाळासाहेबांची राजकीय घोडदौड
इंटकच्या यशस्वी सुरुवातीनंतर बाळासाहेबांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने नगरसेवक म्हणून राजकारणात प्रवेश केला. आपल्या वकिली ज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी नगरपालिकेच्या कामात दाखवलेली चुणूक पाहून काँग्रेस नेतृत्वाने बाळासाहेबांचे नेतृत्वाला फुलण्याची संधी दिली. १९५२ मध्ये पार पडलेल्या मुंबई राज्य विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब वेंगुर्ले मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले.
महाराष्ट्र राज्यनिर्मितीनंतर यशवंतराव चव्हाणांनी बाळासाहेब सावंतांना आपल्या मंत्रिमंडळात घेतले. बाळासाहेबांचा शेती, कामगार, कायद्याचा अभ्यास पाहून त्यांना कृषीमंत्री केले. याच काळात बाळासाहेबांनी महाराष्ट्रात राहुरी आणि अकोला येथे कृषी विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. पुढे इंटकच्या अध्यक्षांचे निधन झाल्यानंतर बाळासाहेब इंटकचे अध्यक्ष बनले. मारोतराव कन्नमवार यांनीही गृहमंत्री म्हणून बाळासाहेबांचा आपल्या मंत्रिमंडळात समावेश केला.
बाळासाहेब सावंत बनले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
मारोतराव कन्नमवार यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारून एक वारसाच झाले असेल, २४ नॉव्हेमबर १९६३ च्या रात्री त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांचे निधन झाले. त्यावेळी यशवंतरावांनी कोकणचे ५५ वर्षाचे ज्येष्ठ नेते डॉ.बाळासाहेब सावंत यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नेमणूक केली. २५ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर १९६३ या दहा दिवसांच्या काळात बाळासाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. ज्येष्ठतेनुसार बाळासाहेब मुख्यमंत्री म्हणून पुढेही राहिले असते, पण यशवंतरावांनी विदर्भाच्या वाट्याची मुख्यमंत्रीपदाची संधी वसंतराव नाईकांच्या रूपाने विदर्भाला दिली.
परिस्थितीच्या रेट्यापुढे एक मुख्यमंत्रीपदासाठी लायक असणाऱ्या या नेत्याने खुशीखुशीने दहा दिवसांनी आपल्या पदाची सूत्रे नव्या नेतृत्वाच्या हातात दिली आणि हा नेता काळाच्या ओघात विस्मृतीत गेला. १२ फेब्रुवारी २००१ रोजी दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाला डॉ.बाळासाहेब सावंत यांचे नाव देऊन महाराष्ट्राच्या या सुपुत्राचा गौरव करण्यात आला.
कलंकित काळाचा बळी
डॉ.बाळासाहेब सावंत यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत सर्वसामान्य लोकांसाठी केलेल्या कामाबद्दल कुणीही त्यांना आठवत नाही. परंतु त्यांच्या आयुष्यातील एका काळाला कलंकित करुन लोकांनी त्यांना आठवणीत ठेवले आहे. सुशीलादेवी पवार उर्फ वनमाला या बाळासाहेबांच्या पत्नी !
ग्वाल्हेरच्या सरदार घराण्यातील सुंदर व्यक्तिमत्व ! श्यामची आई त्यांनी चित्रपातून अजरामर करणाऱ्या मराठी चित्रपट आणि नाटकांमधील अभिनेत्री ! वडिलांच्या आग्रहाखातर कुठल्या ब्रिटिश अधिकाऱ्याऐवजी बाळासाहेब सावंतांसोबत लग्नाच्या बोहल्यावर चढल्या काय आणि तीनच महिन्यात त्यांचा घटस्फोट होतो काय; सगळ्या घटना अचानक घडल्या.
पण याही पेक्षा ज्या प्र.के.अत्रेंना बाळासाहेबांनी पाहुणा म्हणून घरी आणले त्याच अत्रेंची राखेल म्हणून वनमाला यांना हिनवले गेले हे दुर्दैवी होते. आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात “मी कुणाची पत्नी होऊ शकले नाही” अशी बोचरी खंत वनमाला यांनी बोलून दाखविली होती. परंतु बाळासाहेबांसारख्या नेत्याला आयुष्यभर विनाकारण हा कलंक सहन करावा लागला.
– अनिल माने.