महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी मातेस मान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ती कुलदेवता आहे. महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील बालाघाट डोंगररांगात असणाऱ्या तुळजापूर हे तुळजाभवानी मातेचे स्थान आहे. साडेतीन शक्तिपीठांमध्ये त्याला एका पीठाचा मान आहे. हेमाडपंथी बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या तुळजाभवानी मंदिराला शहाजीराजे आणि जिजाऊ या नावांची दोन मोठी प्रवेशद्वार आहेत.
नवरात्राच्या काळात इथे मोठा उत्सव असतो. लाखो भाविक दरवर्षी तुळजापूरला देवीच्या दर्शनासाठी येत असतात. धार्मिक कार्यात मांसाहार निषिद्ध मानला जातो, परंतु तुळजाभवानी मातेच्या पायाशी मटणाचा नैवेद्य ठेवला जातो. काय आहे यामागचे कारण जाणून घेऊया…
कसा असतो तुळजाभवानी मातेचा दररोजचा नैवेद्य ?
तुळजाभवानी मंदिरात दररोज अभिषेक पूजा संपन्न झाल्यानंतर देवीला साडी आणि दागिने परिधान केले जातात. त्यादिवशी ज्या पुजाऱ्याकडे पूजेची जबाबदारी असेल त्याच्या घरुन देवीला नैवेद्य आणला जातो. हा नैवेद्य शाकाहारी असतो. सर्वप्रथम देवीची आरती केली जाते आणि त्यानंतर नैवेद्य दाखवला जातो.
नैवेद्यामध्ये सर्वप्रथम देवीला गोड भात दाखवला जातो. त्यानंतर पोळी, भाजी, चटणी, पापड आणि कोशिंबिरीचा प्रसाद ठेवला जातो. त्यानंतर देवीला काजू बदामाचा प्रसाद ठेवला जातो. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर देवीला पाणी पाजले जाते. त्यानंतर देवीला पाच पानाचा विडा ठेवला जातो. सगळ्यात शेवटी देवीची धुपारती केली जाते.
तुळजाभवानी मातेच्या पायाशी मटणाचा नैवेद्य का दाखवला जातो ?
शाकाहारी नैवेद्यासोबतच तुळजाभवानी मातेच्या पायाशी मटणाचा नैवेद्यही ठेवला जातो. यामागे एक धार्मिक कारण आहे. ज्यावेळी देवीने महिषासुर राक्षसाचा वध केला त्यावेळी तिने महिषासुराला त्याची शेवटची इच्छा सांगायला लावली. त्यावेळी महिषासुराने देवीकडून दोन वरदान मिळवले. पहिले वरदान असे होते की, देवीच्या नावाच्या आधी माझे नाव यावे. तेव्हापासून देवीचे नाव महिषासुरमर्दिनी असे पडले.
दुसरे वरदान असे होते की, माझ्या आवडीच्या मटणाचा प्रसाद देवीआधी मला ठेवावा. देवीने त्याला तथास्तु म्हटले आणि तेव्हापासून देवीच्या पायात मटणाचा नैवेद्य ठेवायला सुरुवात झाली. महिषासुर राक्षस देवीच्या पायाखाली असल्याने हा नैवेद्य त्याला ठेवला जातो, देवीला शाकाहारी नैवेद्य दाखवला जातो.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.