सातारा जिल्हा यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा आणि शरद पवार यांना मानणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थापनेपासून बालेकिल्ला राहिला आहे. साताऱ्यात मागील १५ वर्षांपासून उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीचे खासदार होते. त्यांनी नुकताच खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला.
उदयनराजेंच्या प्रवेशानंतर साताऱ्यात भाजपची स्थिती सुधारल्याचे चित्र आहे. उदयनराजेंच्या प्रवेशापूर्वी जावळीचे आमदार शिवेंद्रराजेनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. दोन्ही छत्रपतींच्या भाजप प्रवेशानंतर शरद पवार २२ तारखेला पहिल्यांदा सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांच्या रॅलीला आणि सभेला लोकांनी केलेली गर्दी अभूतपूर्व होती.
दोन्ही छत्रपतींनी जरी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी साताऱ्यातील जनता हि शरद पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे चित्र यातून बघायला मिळाले. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीत कोणाचा विजय होतो हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली तेव्हा लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली नव्हती. आज वेगळे परिपत्रक काढून साताऱ्याची लोकसभा निवडणूक घोषित करण्यात आली आहे. विधानसभेसोबतच साताऱ्यात लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे. उदयनराजेंविरोधात कोण निवडणूक लढते हे येत्या काही दिवसात निश्चित होईल.
उदयनराजेंनी आज साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले कि शरद पवार जर त्यांच्यासमोर निवडणुकीत उभे राहिले तर मी निवडणुकीतून माघार घेईल. यावेळी बोलताना उदयनराजे हे भावुक झालेले दिसले. शरद पवार हे काल, आज आणि भविष्यात देखील आदरणीय राहतील असे सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले.
पुढे बोलताना उदयनराजे म्हणाले पवार साहेब उभे राहिले तर मी फॉर्म भरणार नाही. फक्त पवार साहेबानी आपल्याला दिल्लीतील त्यांच्या बंगला आणि गाडी वापरू द्यावी.
राष्ट्रवादीचे आमदार आणि नेते शशिकांत शिंदे यांचा आपल्या कोरेगाव मतदारसंघासह साताऱ्यातील इतर भागातही चांगला प्रभाव आहे. त्यामुळे त्यांचं नाव देखील उदयनराजेंविरोधात लढण्यासाठी पुढे येत आहे सोबतच माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचं नाव आघाडीवर असल्याचंही समजते.
बघा व्हिडीओ-
उदयनराजे रडले, म्हणाले, पवारसाहेब वडीलस्थानी, त्यांच्याविरुद्ध लढणार नाही! https://t.co/h4gGpCgK1t pic.twitter.com/Q07H661Rf6
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 24, 2019
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.