बँकेच्या व्यवहारात असलेल्या त्रुटी बघून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मुंबईस्थित पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. यामुळे बँकेला नवी कर्ज देणे, ठेवी स्वीकारण्यासह अनेक गोष्टींवर निर्बंध असतील. तर खातेदार केवळ एक हजार रुपये इतकीच रक्कम काढू शकतील.
बँकेची स्थिती सध्या बिकट होती ज्यामुळे नागरिकांच्या हितासाठी निर्बंध लावणे महत्वाचे होते असे रिझर्व्ह बँकेने म्हंटले आहे. या आर्थिक निर्बंधांचा आदेशानुसार २३ सप्टेंबर पासून बँकेने रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेशिवाय कोणतेही नवे कर्ज देऊ नये, जुन्या कर्जांचे नूतनीकरण करू नये, बँकेने कोणतीही गुंतवणूक करू नये, तसेच नव्या ठेवी स्वीकारू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
पीएमसी बँक डबघाईला आल्याने रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे. बँकिंग रेग्युलेशन ऍक्टमधील नियम ३५ अ अंतर्गत बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. या बँकेच्या राज्यात १३५ शाखा आहेत या सर्व शाखांमधील आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
हा निर्णय माहिती झाल्यानंतर बँकेच्या सर्व शाखांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे. बँकेत खाते असणाऱ्या नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी खातेधारक बँकेच्या कर्मचाऱ्यांशी वाद घालत आहेत.
पीएमसी बँकेला रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय नवे कर्ज देता येणार नाही. तसेच ठेवी स्वीकारता येणार नाही. तसेच पुढच्या काळात बँकेला गुंतवणूक करता येणार नाही. त्याबरोबरच बँकेच्या ग्राहकांना आपल्या खात्यामधून केवळ एक हजार रुपये एवढीच रक्कम काढता येईल.
निर्बंधांच्या काळात बँकेला कर्मचाऱ्यांचे पगार, दैनंदिन खर्च, शाखांच्या जागांचे भाडे यासाठी रक्कम खर्च करता येईल. कायदेशीर खर्चासाठीही ठरावीक मर्यादेपर्यंतच रक्कम खर्च करता येईल.
पीएमसी बँकेच्या सर्वाधिक शाखा या पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात आहेत. या शाखामध्ये बहुतांश मोठ्या हाऊसिंग सोसायटीमधील खाती आहेत. एका खातेधारकाला एका खात्यातून केवळ १ हजार रुपयेच काढता येतील. तुमच्या खात्यात कितीही रक्कम असली तरी महिन्यातून केवळ १ हजार रुपयेच काढता येणार आहेत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.