दि.१६ सप्टेंबर २०१९ रोजी खासरे.कॉम या फेसबुक पेजवरुन “वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी ती पुण्यामधील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये दाखल झाली आणि आज…” या लेखाच्या माध्यमातून लेखकाने बुधवार पेठेतील एका महिलेचा संघर्षमय प्रवास मांडला होता.
आर्थिक परिस्थितीमुळे ती महिला कशी बुधवार पेठेत आली, धंदा करुन ती गावाकडे कसे पैसे पाठवायची, नंतर तिचे बुधवार पेठेतीलच एका किराणा दुकानदारावर जडलेले प्रेम, त्यातून त्यांनी केलेले लग्न, वेश्याव्यवसायातून ती कशी बाहेर पडली आणि आपल्या मुलीला तिने कसे डॉक्टर बनवून दाखवले याचा प्रवास लेखकाने त्यात मांडला होता.
लोकांकडून कौतुक करून घ्यायच्या अपेक्षेने लेखकाने ही प्रेरणादायी सत्यकथा लोकांसमोर आणली नव्हती. मात्र दोन दिवसातच समाजातील लोकांच्या मानसिकतेचे जे अनुभव आले त्यावर आपण गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.
रात्रीच्या ३:३० वाजता लेखकाला कॉल आला आणि विचारलं….
संबंधित स्टोरी खासरे.कॉम पेजवरुन शेअर करण्यात आल्यानंतर काही वेळातच पेजवर दिलेल्या फोन नंबरवर अचानक कॉल यायला सुरुवात झाली. गेल्या सलग दोन दिवसांपासून एकामागून एक असे कॉल येणे अजूनही चालूच आहे. सकाळी, दुपारी, संध्याकाळी, एवढंच नाही तर रात्रीच्या ३:३० वाजताही कॉल येत आहेत.
कॉल करणारे लोक काय प्रश्न विचारत असतील ? तुम्ही कल्पना करु शकणार नाही. त्यांचे प्रश्न आहेत, हा बुधवार पेठेतील नंबर आहे का ? रेट काय आहे ? लडकी मिलेगी क्या ? आणि दोन किती कॉल आले असतील ? ५-१० नव्हे, ५०० हुन अधिक !
ही आहे लोकांची मानसिकता
सतत येणाऱ्या कॉलमुळे लेखकाने इनकमिंग कॉल बंद केले तरीही लोकांनी आपला हेका सोडला नाही. लोक लेखकाला व्हाट्सअपवर “मुलींचे फोटो पाठव, एका रात्रीसाठी मुलगी बाहेर पाठवता का, रेटकार्ड पाठव” असे मेसेज पाठवत आहेत.
एवढेच नाही तर व्हिडीओ कॉल करुन अश्लील संभाषण करत आहेत. आणि हे अजून बंद झाले नाही. सुरूच आहे. हे आर्टिकल लिहीत असतानाच “आता मुलगी मिळेल का ?” अशी विचारणा करणारा कॉल येऊन गेला आहे.
बुधवार पेठेत येणाऱ्या वेश्या स्वतःच्या मर्जीने इथे येत नाहीत. परिस्थिती त्यांना इथपर्यंत आणून सोडते. त्यातही इथल्या एखाद्या वेश्येने धाडस करुन त्यातून बाहेर पडत आपला वेगळा संसार थाटला आणि आपल्या मुलाबाळांना चांगले शिक्षण देऊन त्यांच्यावर अशी परिस्थिती येऊ नये म्हणून खस्ता खाल्ल्या तर त्याबद्दल लोकांचे प्रबोधन करणाऱ्या लेखकाला असे अनुभव येत असतील तर नक्की दोष कुणाच्या मानसिकतेत आहे ? वेश्येच्या की लोकांच्या ? आपणच आपल्याला हा प्रश्न विचारला पाहिजे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.