हृतिक रोशनची प्रमुख भूमिका असणारा सुपर ३० हा चित्रपट खूप चर्चेत आहे. निराधार मुलांना शिक्षण देऊन बुद्धिमान बनवणाऱ्या बिहारच्या पाटणामधील आनंद कुमार या शिक्षकाच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. खुद्द बिहार, राजस्थान आणि दिल्ली सरकारने हा चित्रपट टॅक्स फ्री करुन जास्तीत जास्त विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना पाहण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे.
केम्ब्रिजसारख्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठात शिकण्याची मिळालेली संधी सोडून त्यांनी आपली प्रतिभा गरीब विद्यार्थ्यांना इंजीनिअरिंग एंट्रन्स परिक्षेत यश मिळवून देण्यासाठी वापरून देशात अनेक बुद्धिमान विद्यार्थी घडवले. जाणून घेऊया त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाबद्दल…
परिस्थितीने आनंद कुमारांना सुपर ३० पर्यंत आणून सोडले
आनंद कुमार गणितात अत्यंत हुशार होते. त्यांचे डिग्रीचे शिक्षण होईपर्यंतच स्टॅटिस्टिक्स विषयातील काही पेपर पब्लिश झाले होते. त्याआधारे आनंद कुमारांना केम्ब्रिज विद्यापीठात प्रवेश मिळाला होता, परंतु त्यांच्याकडे फी सोडा, साधे तिकिटापुरतेही पैसे नव्हते. घरी आई पापड बनवण्याचा व्यवसाय करून घर चालवत होती. त्याचदरम्यान त्यांच्या वडिलांचेही निधन झाले. वडिलांच्या जागी अनुकंपा तत्वावर त्यांना सरकारी नोकरी मिळत होती, पण त्यांना वेगळे काहीतरी करायचे होते.
“सुपर ३०” ची स्थापना
१९९२ मध्ये सुरुवातील आनंद कुमारांनी ५०० रुपये प्रतिमहिना भाड्याने खोली घेऊन आपली कोचिंग सुरु केली. तीन वर्षातच जवळपास ५०० विद्यार्थी त्यांच्या कोचिंगमध्ये येऊ लागले. २००२ मध्ये आनंद कुमारांनी “सुपर ३०” कोचिंग इन्स्टिट्यूटची स्थापना केली. त्याद्वारे ३० गरीब विद्यार्थ्यांना मोफत आयआयटी – जेईईची कोचिंग द्यायला त्यांनी सुरुवात केली.
सुपर ३० मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा राहण्याचा खर्चही आनंद कुमार करतात तर त्यांचे जेवण आनंद कुमारांची आई बनवते. संध्याकाळच्या वेळी फी देऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्युशन देऊन त्या पैशातूनच सर्व खर्च भागवला जातो. सुपर ३० पैकी जवळपास २७-२८ विद्यार्थी दरवर्षी आयआयटी क्वालिफाय करतात.
सुपर ३० ची जगभर दखल घेतली गेली
२००९ मध्ये जपानच्या नोरिक फुजीवारा या अभिनेत्रीने सुपर ३० वर एक डॉक्युमेंट्री बनवली. नॅशनल जिओग्राफीक्सनेही सुपर ३० च्या संचालन आणि नेतृत्वावर डॉक्युमेंट्री बनवली. डिस्कव्हरी चॅनेलनेही त्यांच्यावर डॉक्युमेंट्री केली. त्यांची कहाणी “द न्यूयॉर्क टाईम्स” मध्ये प्रकाशित झाली होती.
२०१० मध्ये जगप्रसिद्ध टाईम्स मॅगझीनने सुपर ३० कार्यक्रमाला आशियायातील सर्वश्रेष्ठ संस्था म्हणून सन्मानित केले. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बाराक ओबामा यांनीही त्यांच्या कामाची प्रशंसा केली आहे. सुपर ३० हा चित्रपट त्यांच्याच जीवनावर आधारित आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.