हैद्राबाद शहरातील बालापूर गणपती मंडळाचा “बालापूर गणपती लाडू” भारतात प्रसिद्ध आहे. बालापूरच्या स्थानिक तरुणांनी १९८० मध्ये हा उत्सव तिकडे सुरु केला. दरवर्षी विसर्जनाच्या दिवशी गणपतीला लाडूचा प्रसाद चढवला जातो. त्यानंतर हा लाडू भाविकांसाठी विक्रीला ठेवण्यात येतो.
१९९४ पासून त्यांनी या लाडूचा लिलाव करायला सुरुवात केली. हा लाडू विकत घेतल्यास आपले नशीब फळफलते अशी लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे दरवर्षी हजारो भाविक लाडू विकत घेण्यासाठी गर्दी करतात. यावर्षीही भाविकांच्या प्रचंड गर्दीत “बालापूर गणपती लाडू”साठी तब्बल १७.६० लाख रुपयांची बोली लागली. पाहूया सविस्तर माहिती.
कसा असतो हा लाडू ?
देशात दुष्काळ असो किंवा मंदी, मागच्या २६ वर्षांपासून बालापूर लाडूसाठी भाविकांकडून बोली लावण्याची परंपरा आहे. सर्वसाधारण लाडूंपेक्षा हा लाडू खूप मोठा म्हणजे जवळपास २१ किलोंचा असतो. हा लाडू शुद्ध तुपापासून बनवण्यात येतो. तसेच दोन किलोच्या चांदीच्या ताटामध्ये ठेवून हा लाडू विसर्जन मिरवणुकीच्या वेळी गणपतीच्या मोठ्या मूर्तीच्या हातात ठेवला जातो.
त्यांनतर गणपतीला अर्पण झालेल्या वस्तूंच्या लिलावावेळी मंडळाकडून या लाडूचाही लिलाव केला जातो आणि आलेल्या पैशांतून गावातील विकासकामे केली जातात.
आजपर्यंतची सर्वात मोठी बोली लावून यांनी घेतला लाडू विकत
बालापूर गणपती लाडूला यावर्षी १७.६० लाख रुपयांची प्रचंड बोली लागली. हैदराबादमधील मोठे शेतकरी आणि व्यावसायिक असणाऱ्या कोलन रामरेड्डी यांनी ही बोली लावली. ही आतापर्यंतची सर्वात मोठी बोली ठरली. यावेळी २६ लोकांनी बोलीमध्ये भाग घेतला होता.
पहिल्या वर्षी या लाडूला ४५० रुपयांची बोली लागली होती. दुसऱ्या वर्षी तीच बोली ४५०० वर गेली. वाढत वाढत जाऊन मागच्या वर्षी या लाडूला १५.६० लाख रुपयांची बोली लागली होती.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.