चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लँडर सोबत संपर्क तुटला असला तरी संकल्प तुटला नाही अशा प्रकारचा विश्वास सर्व भारतीयांनी भारतीय अवकाश संशोधन संस्था (ईस्रो)वर व्यक्त केला होता. हा विश्वास सार्थ ठरवत ईस्रोने आपल्या नव्या मिशनला सुरुवात केली आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी मागच्या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनाला या मोहिमेची घोषणा केली होती. हे मिशन यशस्वी झाल्यास अशी कामगिरी करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरेल. यापूर्वी रशिया, अमेरिका आणि चीनने आपापले अंतराळवीर अवकाशात पाठवले होते.
कशी असेल ही मोहीम ?
इस्रोच्या या नव्या मोहिमेला गगनयान मिशन असे नाव देण्यात आले आहे. इस्रो आणि भारतीय वायुसेना यांच्या माध्यमातून हे मिशन राबवण्यात येणार आहे. या मिशन अंतर्गत पहिल्यांदाच भारत तीन अंतराळवीरांना सात दिवसांसाठी अंतराळात पाठवणार आहे.
या अंतराळवीरांना भारतीय वायुसेना प्रशिक्षण देणार आहे. गगनयान मोहिमेसाठी भारत सरकारने १०००० कोटींची तरतूद केली आहे. मोहिमेसाठी भारताने रशिया आणि फ्रान्स देशांसोबत करार केला आहे.
कसे आहे हे यान ?
२०२२ मध्ये या अंतराळयानाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. ३७०० किलो वजनाचे गगनयान पृथ्वीच्या खालच्या कक्षेत स्थापित करण्यात येणार आहे. पृथ्वीपासून ४०० किमी अंतरावर हे अंतराळयान सात दिवस परिक्रमा करणार आहे. २००६ पासून या मिशनवर काम सुरु आहे.
२००९ मध्ये या मोहिमेला भारत सरकारने मान्यता दिली. या यानात जीवन आणि पर्यावरण नियंत्रण प्रणाली असेल. यानात राहणाऱ्या अंतराळवीरांसाठी भोजन आणि स्वच्छतेची व्यवस्था आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.