भारताचे चांद्रयान-२ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरून इतिहास रचणारच होते, पण लँडर “विक्रम” आणि चंद्रादरम्यान केवळ २.१ किमी अंतर राहिले असताना त्याचा इसरो सोबतच संपर्क तुटला.
भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष के.शिवन यांनी संपर्क तुटल्याची घोषणा केली आणि सर्वांच्या चेहऱ्यावर निराशा दिसायला लागली. चांद्रयान-२ ने भारतापासून चंद्रापर्यंतचा ३ लाख ८० हजार किमीहुन अधिक प्रवास योजनेरूप केला, मात्र चंद्राच्या २.१ किमी जवळ गेल्यावर त्याचा संपर्क तुटला.
नेमकं काय घडलं ?
शनिवारी १:३८ वाजण्याच्या सुमारास १४७१ किलो वजनाचा विक्रम ३० किमी उंचीवरुन १.६८ किमी/सेकंद वेगाने चंद्राच्या पृष्ठभागाच्या दिशेने उतरायला सुरुवात झाली. त्यावेळी सगळं सुरळीत होते. चंद्रावर उतरायला २.१ किमी अंतर उरले होते.
१ वाजून ५५ मिनिटांची वेळ झाली असताना इसरोच्या टेलिमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क केंद्रावरील स्क्रीनवर विक्रम लँडर आपल्या निर्धारित मार्गावरून थोडासा बाजूला हटल्याचे दिसले. तिथून त्याचा संपर्क तुटला. इसरोच्या अधिकाऱ्यांच्या मते ज्यावेळी खाली उतरत असताना विक्रमचे थ्रस्टर्स बंद केले त्यावेळेस त्याचा संपर्क तुटला असण्याची शक्यता आहे.
अजूनही मिशन चांद्रयान-२ संपले नाही
इसरोच्या एका अधिकाऱ्याच्या मते विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हा संपूर्ण चांद्रयान-२ मिशनचा केवळ ५% भाग होता. या मोहिमेचा ९५% भाग म्हणजेच ऑर्बिटर यशस्वीरीत्या चंद्राभोवती फिरत आहे. त्याचे वजन २३७९ किलो असून त्याचा कार्यकाल एक वर्षाचा आहे. या एक वर्षादरम्यान तो चंद्राच्या पृष्ठभागाची अनेक छायाचित्रे इसरोला पाठवू शकतो.
अपेक्षित पद्धतीने विक्रमचे लँडिंग झाले नसले तरी शास्त्रज्ञ आकडेवारी गोळा करून त्याचे ऍनालिसिस करण्याच्या प्रक्रियेत आहेत. विक्रमच्या बाहरेच्या पृष्ठभागावर लेझर मिरर, सिस्मोग्राफ, हाय डेफिनेशन कॅमेरा कार्यरत असल्यास त्यातूनही काही निरीक्षणे घेता येतील.
भारतीयांना इसरोवर गर्व आहे
इसरोची चांद्रयान-२ मोहीम साधीसुधी नव्हती. पूर्वीच्या चांद्रयान-१ मोहिमेतून भारताने जगाला चंद्रावरील पाण्याच्या शक्यतेचे पुरावे देऊन आपली कर्तबगारी दाखवून दिली होती. चांद्रयान-२ मोहिमेतून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा प्रयत्न करणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. इसरोच्या वैज्ञानिकांवर संपूर्ण देशवासियांना विश्वास आहे.
रशियाने भारताला लँडर देण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर भारताने स्वतःच आपला विक्रम लँडर तयार केला होता. अवकाश संशोधनासाठी भारत कुणावर निर्भर नाही हे भारताने या मोहिमेतून जगाला दाखवून दिले आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.