२०१४ मध्ये देशभरात मोदी लाट आणि आणि केंद्रात मोदी सरकार स्थापन झाले. त्यानंतर काही महिन्यात महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूका झाल्या. या निवडणुका सर्वच पक्षांनी स्वबळावर लढवल्या. भाजपने महाराष्ट्रात सर्वात जास्त जागा जिंकल्या. तर शिवसेनेनेही दुसऱ्या क्रमांकाच्या जागा जिंकल्या. निकालानंतर शिवसेना भाजपने पुन्हा युती केली आणि महाराष्ट्रात युतीचे सरकार स्थापन झाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने महाराष्ट्राला एक तरुण मुख्यमंत्री मिळाला. पुढील काही महिन्यात आता महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. पुढच्याच महिन्यात विधानसभेसाठी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. सध्या मुख्यमंत्री फडणवीस महाजानदेश यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरत आहेत.
आजच या महाजानदेश यात्रेच्या दुसर्या टप्प्याला धुळ्यातून सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांना राज्यभरात मोठ्या प्रमाणात प्रवास करावा लागतो. राज्याचे प्रमुख म्हणून त्यांना अनेकवेळा विमान अथवा हेलिकॉप्टरने प्रवास करावा लागतो. त्यांच्या या प्रवासासाठी सरकारकडे स्वतःच्या मालकीचे छोटे विमान आणि हेलिकॉप्टर आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हेलिकॉप्टर प्रवासात अनेकदा बाधा आल्याचे आपण बऱ्याचदा बघितले आहे. फडणवीस हे ३-४ वेळा हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले. त्यामुळे त्यांच्या प्रवासासाठी खाजगी विमानाचा देखील बऱ्याचदा वापर करण्यात आला.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रवासावर किती खर्च होतो याची माहिती समोर आली आहे. माहिती अधिकारात ही माहिती नितीन यादव यांना मुख्यमंत्री सचिवालयातून देण्यात आली आहे. ऑक्टोबर २०१४ ते मे २०१९ या कालावधीत किती खर्च झाला याची माहिती समोर आली आहे.
या जवळपास ५ वर्षाच्या कालावधीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टर, चॉपर, खासगी जेट विमानाच्या वाहतुकीसाठी तब्बल ५७ कोटी ६२ लाख १८ हजार रुपये खर्च आला आहे. सर्वात जास्त म्हणजे २० कोटी २० लाख रुपये खर्च २०१८-१९ या वर्षात झाल्याचे या माहितीतून समोर आले आहे.
तर २०१७-१८ या वर्षात ६ कोटी १३ लाख रुपये खर्च हा हेलिकॉप्टर भाड्याने घेतल्याने तर याच वर्षात १३ कोटी २४ लाखाचा खर्च हा विमान आणि पायलट यांच्यावरील आहे असेही या माहितीत नमूद करण्यात आले आहे.
फडणवीस यांच्या प्रवासासाठी २०१४-१५ मध्ये ५ कोटी ३७ लाख, २०१५-१६ मध्ये ५ कोटी ४२ लाख, २०१६-१७ मध्ये ७ कोटी २३ लाख, २०१७-१८ मध्ये १९ कोटी ३७ लाख, तर २०१८-१९ मध्ये सर्वाधिक २० कोटी २० लाख खर्च झाला आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.