प्रिय प्रविण,
असा कसा रे मनाला चटक लावून गेलास भावा, राजसाहेबांनी दाखवलेले नवनिर्माणाचे स्वप्न पूर्ण होताना तुला पाहायचे नव्हते का. अरे लाख येतील अशा नोटिसा, त्यासाठी आपला पक्ष आणि आपले लाडके राजसाहेब खंबीर आहेत, तू का तुझा जीव पणाला लावलास. एवढा कसा रे निःस्वार्थी झालास बाबा, तुला थोडा पण स्वार्थ दिसला नाही का?
अरे त्या भाजपची तिरडी उचलायची होती रे आपल्याला, पण आज मात्र तू तुझाच देह आम्हाला उचलायला लावलास. माझ्यासारख्या असंख्य महाराष्ट्र सैनिकांना आणि राजसाहेबांनी मांडलेला नवनिर्माणाचा हा डाव अर्ध्यातच सोडून गेलास.
निष्ठेची विष्ठा झालेल्या राजकारणात निस्सीम निष्ठा काय असते हे तुझ्या रूपाने जरी आम्हाला दिसले असले तरी हा मार्ग योग्य नव्हता रे दादा. आपल्या राज साहेबांनी आधीच सांगितले होते संयम ठेवायला, पण तुझा कसा रे संयम सुटला.
राज साहेबांनी आणि हजारो महाराष्ट्र सैनिकांनी आजवर अशा कित्येक नोटीसांना तोंड दिलं आहे, मग यशाचं शिखर समोर दिसत असताना आत्ताच का धीर खचून दिलास.
हे भाजपचे लोक कसे आहेत हे माहीत नव्हतं का तुला. ते लाख प्रयत्न करतील राजसाहेबांना अडकवण्याचा पण आपलं नाणं खणखणीत असताना आपण घाबरून जायची गरजच काय. आपल्या राज साहेबांच्या केसालाही धक्का लावण्याची हिम्मत नाही कोणामध्ये. योग्य वेळ आल्यावर राज साहेब नक्की प्रत्युत्तर देतील, पण तू खूप घाई केलीस रे.
आपली वेळ वाईट असताना आपल्यावर कोल्हे कुत्रे तुटून पडतात, पण आपण वाघ आहोत हे तू विसरलास रे बाळा. असा स्वतःचा लचका कसा तोडून दिलास.
तुझ्या जाण्याने आपले तमाम महाराष्ट्र सैनिक हळहळले रे भाऊ. निःशब्द झालेत सगळे. कुणाला दोष द्यावा त्यांनी. म्हणूनच “प्रविण भावा चुकलास तू…”
आता तुझ्या जाण्याने जी पोकळी निर्माण झालीय ती आम्हाला भरून काढायचीय, सत्तेला विळखा घालून बसलेल्या विषारी सापाला बिळात हात घालून बाहेर काढायचंय आणि राजसाहबांनी दाखवलेल्या नवनिर्माणाच्या स्वप्नाला सत्यात उतरवायचंय. त्यासाठी प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला जोशाने लढायचंय म्हणूनच प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाने स्वतःच्या जीवाला जपायचंय.
प्रविण, भावा तुझ्या आत्म्याला शांती लाभो, तुझ्याकडून जी चूक झाली ती चूक कोणाकडूनही न होवो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना.
तुझा सहकारी मनसैनिक,
संदिप होले.