एका बाजूला सांगली कोल्हापूरसारखी शहरे अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेली आहेत तर दुसऱ्या बाजूला मराठवाडा अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला. ज्या केसीएमसी कंपनीला याचे कंत्राट देण्यात आले त्यांनी या कामात दिरंगाई केली.
त्यांनतर सोलापूरच्या आयआयटीएम सोलापूर यांच्याकडील एक विमान आणून पाऊस पाडण्यासाठी ट्रायल घेण्यात आली, परंतु या ट्रायलमध्येही सरकारला पाऊस पाडण्यात अपयश आले. आता सरकारने कृत्रिम पावसासाठी अमेरिकेहून विमान मागवले आहे. हा कृत्रिम पाऊस आणि त्याची थोडक्यात माहिती आपण जाणून घेणार आहोत.
भारतात यापूर्वीही झाला आहे कृत्रिम पावसाचा प्रयोग
दुष्काळावर मात करण्यासाठी जगभर अमेरिका, इस्रायल, कॅनडा, रशिया, आफ्रिकेतील काही देश आणि युरोपीय देशांमध्ये कृत्रिम पावसाचे प्रयोग केले जातात. या सर्वांपेक्षा चीनला कृत्रिम पावसाचे यशस्वी तंत्र गवसले आहे, पण त्यांनी आपले तंत्र अद्याप कुणाला सांगितले नाही. २००३ मध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असताना महाराष्ट्रातही हा प्रयोग राबवला गेला होता.
बारामती आणि शेगाव या पर्जन्यछायेच्या ठिकाणी रडार केंद्रे स्थापन करून त्यांच्या २०० किमी परिघात कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवला होता. त्यावेळी थोडा पाऊस झाला होता. पण पावसासाठी अनुकूल ढग नसल्याने विमान अनेकदा उतरवावे लागले होते.
कृत्रिम पावसासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात ?
कृत्रिम पावसासाठी वेगवेगळे घटकांचा विचार करावा लागतो. हवामानाच्या बाबतीत विचार करायचा झाला तर त्यामध्ये ढगांमधील बाष्पाची घनता, तापमान, वाऱ्याची दिशा आणि वाऱ्याचा वेग इत्यादि घटकांचा समावेश आहे. साधनांचा विचार करायचा झाला तर ढगांच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी खास रडार यंत्रणा, पाऊस पाडण्यासाठी विमाने, कॉम्प्युटर यंत्रणा, तज्ञ हवामानशास्त्रज्ञ अशा गोष्टी आवश्यक असतात. तसेच सोडियम क्लोराईड, सोडिअम आयोडाईड, ड्राय कार्बनडायॉक्साईड इत्यादि रसायनांचीही आवश्यकता असते.
अशी लावतात ढगाळ कळ आणि पाडला जातो कृत्रिम पाऊस
कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. ज्या भागात कृत्रिम पाऊस पडायचा असतो तिथल्या आकाशातील बाष्पयुक्त ढगांचा सर्वप्रथम शोध घेतला जातो. तसेच त्या परिसरात ७०% आर्द्रता असावी लागते. ढगांतील बाष्पाचे हिमकणांमध्ये रूपांतर झाल्यांनतर पाऊस पडतो, म्हणून अशा बाष्पयुक्त ढगांत रसायनांचे बीजारोपण करून बाष्पाची घनता वाढवली जाते. डॉप्लर रडारने कृत्रिम पावसासाठी अनुकूल ढग आल्याचे सांगताच पुढील ३ पद्धतींनी पाऊस पाडला जातो.
१) बाष्पयुक्त काळ्या ढगांत सोडियम क्लोराईड सारख्या रसायनांची फवारणी केली जाते. हे रसायन बाष्पाला चिकटल्यानंतर ढगांमध्ये बाष्पाची घनता वाढते. त्यांचे हिमकण आणि नंतर पावसाचे थेंब तयार होतात. थेंबांचा आकार वाढल्यानंतर पावसाच्या रूपात ते जमिनीवर पडतात.
२) जमिनीवरूनच बाष्पयुक्त ढगांवर रसायन असणाऱ्या रॉकेटचा मारा केला जातो. ढगात जाऊन रसायनांचा स्फोट झाल्यावर रसायनामुले बाष्पाची घनता वाढून पाऊस पडतो.
३) पर्जन्य यज्ञ : या पद्धतीत बाष्पयुक्त ढगांच्या खाली रसायनांचे ज्वलन केले जाते. त्या रसायनांची वाफ ढगात गेल्यानंतर ढगांची घनता वाढून पाऊस पडतो.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.