आर. आर. आबा नावाचा अगदी भोळा माणूस या महाराष्ट्राच्या मातीनं अनुभवला. उभ्या राजकारणात कमालीचा साधा चेहरा खेड्यामातीतल्या माणसांना जगायला बळ देणारा ठरला. वयाच्या २२ व्या वर्षी राजकारणात येणं आणि विजयाची पताका शेवटच्या घटकापर्यंत अबाधित राखणं हे केवळ आणि केवळ आबाच करू शकतात.
सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर हा भाग साखरपट्टा म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यात ओळखला जातो. मात्र दुष्काळाच्या झळा उरावर घेऊन काळ्या मातीत राबणाऱ्या आई – बापाच्या पोटी जन्माला आलेला, अंजनीच्या मातीतला फाटक्या कपड्याचा, शेरडा – करड्याच्या मागं फिरणारा रावसाहेब रामराव पाटील उर्फ आबा.
ज्याचं जगणं संघर्षाचं असतं त्याच्या उरात समाजाच्या सन्मानाची आग, न्याय देण्याची भावना आणि समाजाचं परिवर्तन करण्याची तीव्र इच्छाशक्ती पेटून उठते. आबांचंही तेच झालं. वयाच्या अवघ्या २२ वर्षी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. त्यावेळी आबांच्या अंगावर नीट कपडेही नव्हते.
सोबतीला प्रामाणिक स्वभाव घेऊन, गोरगरिबांविषयीची असणारी तळमळ यातूनच पुढं आबा बारा वर्षे सावळज गटातून जिल्हा परिषदेवर निवडून गेले. वसंतदादांनी हेरलेला हा हिरा पुढं शरद पवारांनी आपल्या काबूत अलगद जपला. आबांच्या चाणाक्षपणा आणि कर्तृत्वामुळे पदांच्या मागे फिरण्याची वेळ आली नाही तर सगळी पदे आबांच्या मागे गेली.
मुंबईच्या हल्ल्याच्या वेळी आबा गृहमंत्री होते. हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देताना “बडे बडे शहरो में छोटी छोटी बाते होती रहती हैं|” असं अनासाये बोलून गेले. जबाबदारी अंगावर असताना असं बोलणं त्यांच्याही जिव्हारी लागलं. त्यावर त्यांना राजीनामा द्यावा लागला. मात्र या मखमली सत्तेत नांदत असताना कधी गावाकडच्या मातीला अन मातीतल्या मातीमय माणसांना आबांनी अंतर दिलं नव्हतं.
ज्या दिवशी राजीनामा दिला त्याच दिवशी शासकीय बंगला सोडून आबा थेट आपल्या गावी अंजनीला पोहचले. शेवटच्या माणसाशी नाळ जोडलेले आबा त्या हल्ल्यानेही मनातून दुखावले होते मात्र धांदलीने चुकीचं वक्तव्य केल्याची बोच त्यांना सातत्याने टोचत राहिली.
काहीच हातात नव्हतं, आज लोकांचे प्रश्न सोडवायला शिकलो, इतकी माणसं मला ओळखायला लागली. त्यांच्यासाठी काहीतरी करायला मिळतं याचा त्यांना आनंद असायचा. आयष्यात गमावण्यासारखं काहीही नव्हतं हेही ते आठवणीने सांगायचे. १९९० साली पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेलेल्या आबांनी आपण गरीब आहोत हे कधी दाखवून दिलं नाही तर ते काळजात जपलं आणि त्यासाठी सदैव काम करत राहिले. गावचा भोळा माणूस सत्तेत बसला. गरिबांसाठी योजना आणतो, काम करतो, बांधावर जाऊन भाकरी खातो.
आंब्याच्या झाडाखाली येऊन आंबे खातो. सर्वोच्च पदांवर स्वार झालेला माणूस किती सामान्य असू शकतो हे समस्त महाराष्ट्रानं अनुभवलं. आबांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरु करून गावं स्वच्छ आणि सुंदर होऊ शकतात आणि मी करेन अशी ग्वाही देणारा पहिला ग्रामविकास मंत्री होऊन गेला. आजचं स्वच्छता अभियान आबांनी तर १५ वर्षांपूर्वीच सुरु केलंय. गावगाडा हागणदारीमुक्त करण्यासाठी कंबर कसणारा मंत्री हा एखाददुसराच असतो. जो कुणी, कधी विचारही केला नव्हता ते आबांनी प्रत्यक्षात करून घेतलं.
अंजनीचा सुपुत्र २००४ साली उपमुख्यमंत्री आणि गृहखात्याची जबाबदारी सांभाळताना ग्रामीण भागासाठी अजून काम करण्याची आवश्यकता असल्याने नवा धाडसी निर्णय घेतला. ग्रामीण भागातली पोरंसोरं शहरसिटीला जाऊन डान्सबारच्या नादी लागत होती आणि हे ग्रामीण संस्कृतीला बरं नाही म्हणत प्रचंड मोठा आणि धाडसी निर्णय आबांनी घेतला. महाराष्ट्रातल्या ग्रामीण आया बायांचे संसार वाचवणारे आबा त्या माऊलीच्या आजही लक्षात आहेत.
अंजनीचा खेडूत ते जिल्हा परिषद सदस्य, सलग सहा वेळा आमदार आणि पश्चिम महाराष्ट्राचा नेता, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, उपमुख्यमंत्री इतकी सगळी पदे भूषवणारे आबा एकाही सहकारी संस्थेच्या मालकीचे झाले नाहीत, इतक्या मोठ्या राजकीय कारकिर्दीतही आबांवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही, हे विशेष.
अंत्योदयांच्या समृद्धीसाठी झटणाऱ्या आबांना कुणीतरी आव्हान दिलं आणि आबांनी ते आव्हान स्वीकारत थेट गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागाचं पालकत्व मोठ्या अभिमानाने आणि धाडसाने घेतलं. आदिवासींच्या मुलांना दत्तक घेऊन मुख्य प्रवाहात आणलं. राजकारण आणि समाजकारण करताना आपली ओळख आपसूक निर्माण केली गेली. आबांना व्यसन होतं आणि त्याच व्यसनाने त्यांचं निधन झालं.
प्रचंड मोठं कर्तृत्व उभं केलं असलं आणि सत्तेच्या मखमली खुर्चीवर बसले असले तरीही ग्रामीण बोलीचा अन मातीचा लहजा त्यांच्या वक्तृत्वाच्या बोलीतून ओसंडताना शेवटपर्यंत पाहायला मिळाला. संसदपटू म्हणूनही सन्मान त्यांना मिळाला. कधीही न विसरता येणाऱ्या अशा कर्तृत्वाची देण या महाराष्ट्राला देऊन गेलेल्या पंचगंगेच्या सुपुत्राला जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन..!
-विकास विठोबा वाघमारे (वाघोली, ता – मोहोळ, जि. सोलापूर ? 8379977650)
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.