आज महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचे लाडके व्यक्तिमत्व आर आर उर्फ आबा पाटील यांची जयंती. आबा हे नेहमीच साधे जीवन जगले आहेत. त्यांच्या साधेपणाबद्दल एक किस्सा दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सांगितला होता.
सांगली जिल्हय़ातील तासगाव तालुक्यातील अंजनी या छोटय़ाशा गावात आबा चा जन्म झाला. रामराव पाटील हे त्यांचे वडील गावचे सरपंच होते. सुरुवातीला घरची परिस्थिती चांगली होती. म्हणजे नोकर-चाकर घरी राबत होते; परंतु पुढे कुटुंब विभक्त होताना भावकीत तंटा झाला. तो थेट कोर्ट-कचेरीपर्यंत पोहोचला. या भाऊबंदकीत घराची परिस्थिती पार बिघडून गेली. शेवटी तीन एकर जमीन वाटय़ाला आली.
भाऊबंदकीच्या तणावाने वडिलांची प्रकृती खालावली आणि शालेय जीवनातच आर. आर. पाटील यांचे पितृछत्र हरपले. घरी प्रचंड गरिबी आली. मागे पाच भावंडे. त्यांच्यासाठी शिक्षण सोडून नोकरी करावी की, शिक्षण पूर्ण करावे, असा पेच निर्माण झाला. शेवटी कमवा आणि शिका योजनेत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.
शालेय जीवनपासूनच त्यांच्यात नेतृत्व गुण होते. शांतीनिकेतन संस्थेत शिकत असताना विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका योजनेतील रोजगार वाढवून मिळावा, यासाठी त्यांनी शिष्टमंडळ घेऊन संस्थेचे अध्यक्ष पी. बी. पाटील यांची भेट घेतली होती.राजकीय जीवनाची सुरुवात त्यांनी सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून केली.
१९७९ ते १९९० अशी ११ वर्षे ते सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य होते. १९९० साली ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. एकंदर सहा वेळा ते विधानसभेवर निवडून गेले. त्यांच्यावर पक्षाने जी जबाबदारी सोपवली त्यावर त्यांनी आपला ठसा उमटवला.
आर आर पाटील हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना मुंबई वर 26 11 चा भीषण हल्ला पाकिस्तानी दहशतवाद्यानी केला. तेव्हा आबा यांनी मराठीत व्यवस्थित प्रतिक्रिया दिली पण हिंदी मध्ये प्रतिक्रिया देताना थोडी गडबड झाली. हिंदीतील त्यांच्या बाईट चा चुकीचा अर्थ लावून त्यांची मीडिया ट्रायल घेतली.
आबा सारख्या साध्या माणसाला ते सहन झाले नाही. त्यांनी राजीनामा दिला व आपला पसारा भरून ते गावी निघून गेले. तेव्हा आबा यांना भेटायला विलासराव देशमुख आणि जयंत पाटील यांच्या गावी गेले तेव्हा आबा पाटील हे घोट्या पर्यंत चिखलाने माखलेले हातात फावडे व उसाला पाणी देत होते. हे पाहून विलासराव देशमुख यांना धक्का बसला. काल पर्यंत उपमुख्यमंत्री असणारा माणूस सर्व रुबाब प्रतिष्ठा विसरून शेतात सामान्य शेतकऱ्याप्रमाणे राबत होते.
आबांचा साधेपणा नेहमीच भावणारा होता. कितीही मोठे झाले तरी त्यांचे मातीशी नाते जुळलेले होते. अशा या सामान्यांचे नेता असणाऱ्या आबा पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..