क्रिकेट हा आपल्यापैकी अनेकांचा आवडता खेळ असेल. भारतात क्रिकेटच्या चाहत्यांची कमी नाहीये. क्रिकेट हा इंग्लंडने जगाला दिलेला खेळ आहे. क्रिकेटची सुरुवात इंग्लंडमधून झाली. क्रिकेटची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा त्याचे स्वरूप खूप वेगळे होते. क्रिकेटमध्ये आज अनेक नवनवीन बदल होत असून नवनवीन नियम येत आहेत.
फुटबॉलनंतरचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लोकप्रिय खेळ म्हणून क्रिकेटकडे बघितले जाते. क्रिकेट संबंधीच्या दस्तऐवजांमध्ये तेराव्या शतकात क्रिकेट खेळण्यास सुरुवात झाल्याचा उल्लेख आढळतो. त्यावेळी या खेळाचे स्वरूप हे अगदी प्राथमिक स्वरूपाचे होते. त्यानंतर हळूहळू अनेक बदल होत या खेळाला आजचे आधुनिक रूप प्राप्त झाले.
क्रिकेटचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना १८४४ साली अमेरिका आणि कॅनडा यांच्यात खेळवला गेला. १८६२ मध्ये इंग्लंडच्या संघाने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. त्यानंतर १५ मार्च १८७७ रोजी एमसीसी संघ आणि सिडने मेलबर्नचा संघ यांच्यात कसोटी सामना झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा पहिलाच कसोटी सामना ठरला.
त्यावेळी क्रिकेटचे नियम फार वेगळे होते. क्रिकेटमध्ये पहिला षटकार पाहायला चाहत्यांना तब्बल २१ वर्षे वाट बघावी लागली होती. १८९८ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यादरम्यान अडिलेडवर कसोटी सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या जो डार्लिंगने १७८ धावांची खेळी खेळली होती. याच सामन्यात जो डार्लिंगच्या बॅटने क्रिकेटमधला पहिला षटकार लागला होता. या खेळीमध्ये डार्लिंग यांनी २६ चौकार आणि तीन षटकार लगावले होते.
पण पहिला षटकार लागायला तब्बल २१ वर्षे लागण्याचं कारण हे वेगळं होतं. त्यावेळी क्रिकेटचे नियम वेगळे होते त्यामुळे पहिला षटकार लागायला एवढा उशीर लागला. त्यावेळी जेव्हा चेंडू मैदानाबाहेर जायचा तेव्हाच षटकार दिला जायचा. जर चेंडूने फक्त सीमारेषा पार केली तर त्यावेळी पाच धावा दिल्या जायच्या.
या नियमामुळे क्रिकेटमध्ये ५ धावा देखील बघायला मिळायच्या. आता मात्र क्रिकेटमध्ये पाच धावा अशाप्रकारे मिळत नाहीत. क्रिकेटमध्ये दिवसेंदिवस नवीन नियम येत असून जुने नियम हद्दपार होत आहेत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.