पंचगंगा, कृष्णा नदीला आलेल्या पुराची पातळी हळूहळू कमी होत आहे. बचावकार्य गतीने सुरु आहे. पूर ओसरत असताना प्रशासन त्या त्या भागात जाऊन आधी पाहणी करतील. पुनर्वसन करण्यापूर्वी तिथली दुर्गंधी, गाळ, मृत प्राणी, पडझड किंवा पडायला झालेली घरे, झाडे, विद्युत तारा, खांब, विषारी जीव, खचलेले रस्ते, इत्यादि बाबींची पाहणी करुन तो भाग पुनर्वसनासाठी सुरक्षित आहे का ते तपासले जाईल. त्यानंतरच नागरिकांना तिथे सोडतील अशी शक्यता आहे.
सुरुवातीला स्वच्छतादूत, सर्पमित्र, डॉक्टर, आलेली मदत वितरण व्यवस्थेसाठी स्वयंसेवी लोक, इत्यादि मनुष्यबळ लागेल.
सर्व भागांतून मदत संकलित होत आहे. जिथपर्यंत रस्ते वाहतूक सुरु आहे तिथपर्यंत मदत पोहोचवली जात आहे. पाणी कमी झालेल्या ग्रामीण भागातुन स्थलांतरित झालेली लोकं सूचना मिळतील तसे आपल्या गावाकडे, घराकडे माघारी फिरायला सुरुवात झाली आहे.
पूरग्रस्त ग्रामीण भागातील गावांमध्ये शाळा, मंदिरे अशा ठिकाणी गावातील ग्रामपंचायत, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक इत्यादिंच्या पुढाकाराने मदत संकलन केंद्र सुरु करण्याची प्रक्रिया सुरु आहे. याबाबत माहिती मिळाली की आपल्यापर्यंत क्रमाक्रमाने पोहचवली जाईल. त्यानंतर बाहेरील सर्व मदतकर्त्यांना थेट आपली मदत अशा गावांमध्ये पोहोचवता येणार आहे.
काही ठिकाणी मदत संकलन, सॉर्टिंग आणि किट बनवण्यासाठी मध्यवर्ती केंद्र सुरु करण्यात आली असुन त्याठिकाणी आलेल्या मदतीची किट्स बनवण्यासाठी अनेकजण कार्यरत आहेत. बाहेरुन येणारी मदत पूरग्रस्त ठिकाणी आणि तिथून ती गरजू लोकांच्या हातात यासाठी साखळी (रिले) पद्धतीनेही काम करता येईल.
पिण्याच्या पाण्याची जास्त गरज भासत आहे. बाकीच्या मदतीपेक्षा पिण्याचे पाणी प्रायोरिटीने पोहचवता आले तर बरं होईल. पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरीनचीही गरज आहे.
धान्य वगैरे गोष्टी मोठ्या प्रमाणावर गोळा होत आहेत. गिरणीसाठी विद्युतपुरवठा सुरळीत झाला नसल्याने गहू, ज्वारी, बाजरी या गोष्टी पीठ स्वरुपात दिल्या गेल्या तर ते योग्य राहील आणि धान्याची अफरातफर अशा गोष्टींनाही वाव मिळणार नाही.
स्वयंपाकासाठी जळाऊ लाकडे, किराणा, डाळी, प्लास्टिक ताट-वाट्या, चटई-ब्लँकेट, मच्छर कॉईल, इतर दैनंदिन वस्तू या गोष्टींची मदत कमी पडत आहे. तयार स्वरुपातील मॅगी, बिस्किटे, फरसाण यावर भर द्या.
जनावरांसाठी पेंड, भुसा या स्वरुपातील मदत वाहतुकीच्या आणि वितरणाच्या दृष्टीनेही सोपी राहील. जनावरांसाठी लागणारी औषधेही देता येतील.
शैक्षणिक साहित्य, कपडे यांचीही मदत लागेल. शक्यतो एकेक शाळा दत्तक घेऊन तिथल्या विद्यार्थ्यांना मदत करता येईल.
सर्वात महत्वाचे गेले आठवडाभर सांगलीकर, कोल्हापूरकर आणि ग्रामीण भागातील बांधव एकमेकांना मदतीसाठी झटत आहेत. त्यांना विश्रांती किंवा हेल्पिंग हँड म्हणुन बाहेरच्या भागातील कॉलेज, स्पर्धापरीक्षा क्लासेस, सार्वजनिक मंडळे, संस्था, संघटना, ग्रुप्स आदि लोकांनी एक-एक दिवस येऊन इथे लागणाऱ्या मदतीसाठी श्रमदान करता येईल.
आपली मदत योग्य, गरजू लोकांपर्यंत जावी अशी आपल्या सगळ्यांची भावना आहे. सर्वजण प्रामाणिकपणे काम करत आहेत. लोकं देतील ती मदत घेऊया, इरिटेटेड लोकांकडे दुर्लक्ष करुया.
अनिल माने – 9096207033.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.