कर्नाटकातील अलमट्टी धरणातून ५ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पण हाच विसर्ग जर काही दिवसांपूर्वी सुरु झाला असता तर कोल्हापूर आणि सांगलीमध्ये जी परिस्थिती उद्भवली आहे ती पूरस्थिती एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली नसती. मुसळधार पाऊस आणि धरणांतून करण्यात आलेल्या विसर्गामुळे पंचगंगा आणि कृष्णा नद्यांना महापूर आला. मागील अनेक दिवसांपासून हे शहरे आणि अनेक गावं पाण्याखाली आहेत.
लाखो लोकं या महापुरामुळे स्थलांतरित झाले असून अनेकांना आपले जीव देखील गमवावे लागले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील गंभीर पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याशी संपर्क साधला होता. अलमट्टी धरणातून जास्त विसर्ग करण्याची विनंती काल करण्यात आली होती.
पण कर्नाटक सरकारने मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. आज मात्र ५ लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. आजच्या परिस्थितीमुळे २००५ च्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. २००५ मध्ये देखील अशीच परिस्थिती उद्भवली होती.
२००५ मध्ये सांगलीत प्रचंड महापूर आला होता. त्यावेळी महाराष्ट्राचे गृहमंत्री होते आर आर आबा पाटील. याच स्वरूपाचा महापूर त्यावेळेस येऊन देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नव्हते. नुकसान कमी होण्यास कारण ठरली होती आर आर आबांची कर्नाटक सरकारला दिलेली धमकी.
त्यावेळी सांगलीतील कृष्णा नदीला महापूर आल्यानंतर आबांनी कर्नाटक सरकारला अलमट्टी धरणाचे सर्व दरवाजे उघडण्याची विनंती केली. आणि जर विनंती मान्य नाही केली तर कर्नाटक मध्ये महाराष्ट्रातील धरणांचे पाणी सोडून देऊ अशी धमकी देखील दिली होती. त्यावेळी तत्कालीन कर्नाटक सरकारने देखील त्याची दखल घेत, अलमट्टी धरणाचे सर्व दरवाजे उघडून कृष्णेच्या पाण्याला वाट करून दिली आणि काही काळातच सांगलीतले जनजीवन पूर्ववत झाले होते.
देवेंद्र फडणवीस सरकारने देखील अशाच प्रकारे वेळीच कर्नाटक सरकारला विनंती केली असती सांगली कोल्हापूरमध्ये हि आजची परिस्थिती उद्भवली नसती. धरणे ज्यावेळी ७० टक्के भरली त्याचवेळी त्यातून विसर्ग सुरु केला पाहिजे जेणेकरून पाण्याचा विसर्ग होण्यासाठी वेळ मिळेल आणि आपत्कालीन परिस्थिती उद्भवणार नाही. पण असे यावेळेस मात्र घडले नाही. पूरस्थिती बघून सांगलीतील नागरिक स्व. आर. आर. आबा यांची आठवण काढत आहेत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.