सांगली आणि कोल्हापूर मागील ४-५ दिवसांपासून महापुराने बाधित झालं आहे. महापुराने लोकांचे प्रचंड हाल होत असून अजूनही अनेक भागात मदत पोहचली नाहीये. तर जी मदत पोहचत आहे ती देखील अपुरी पडत आहे. या महापुरात अनेकांचे प्राण गेले असून यामध्ये जनावरांना देखील मोठा फटका बसला आहे.
अनेक जनावरं या महापुरात वाहून गेली असून ठिकठिकाणी पुराच्या पाण्यात जनावरं तरंगताना दिसत आहेत. कोल्हापूर आणि सांगलीतील पुराच्या पाण्याची पातळी थोड्याफार प्रमाणात कमी झाली असली तरी अजूनही पूरस्थिती नियंत्रणात नाहीये. सरकारकडून NDRF च्या तुकड्या पाठवण्यात उशीर झाल्याची नागरिकांची भावना आहे.
आज गिरीश महाजन आणि सुभाष देशमुख यांनी या भागात भेट दिली असता त्यांना नागरिकांच्या संतापाचा सामना करावा लागला. लोकांनी त्यांना घेराव घालून जाब विचारला. तर सरकारने आज एक शासन आदेश काढला असून तो देखील मोठ्या प्रमाणात वादात सापडला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारनं सांगली, सातारा आणि कोल्हापुरातील पूरग्रस्तांची क्रूर थट्टा चालवली असल्याची नागरिकांनी भावना व्यक्त केली आहे. सरकारनं परिपत्रक काढून दोन दिवस पाण्यात बुडल्यास 10 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ मोफत मिळणार असल्याचं जाहीर केलं आहे.
अतिवृष्टी आणि पुरामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्धभवून दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी क्षेत्र पाण्यात बुडलेले असल्यास निराधार होणाऱ्या कुटुंबांना प्रति कुटुंब 10 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ मोफत देण्यास सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे.
कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांसाठी राज्यभरातून मदतीचे अनेक हात पुढे येत असून ठिकठिकाणी मदत जमा केली जात आहे. पण सरकारने हा जीआर काढून पूरग्रस्तांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार चालवल्याची संतप्त भावना जनतेकडून व्यक्त केली जात आहे. दोन दिवस क्षेत्र पाण्याखाली बुडलं असल्यावरच अन्नधान्य मोफत देण्याच्या अटी-शर्थी म्हणजे लोकांच्या जखमेवर मीठ चोळणारा प्रकार असल्याची भावना अनेकांनी मांडली आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.