देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं आहे. नेतृत्व, वक्तृत्व आणि कर्तृत्त्वाच्या जोरावर अनेक लढाया यशस्वीपणे लढलेली रणरागिणी आज मृत्यूवर विजय मिळवू शकली नाही, हे दुर्दैवच. सुषमा स्वराज यांचं असं अचानक जाणं देशवासीयांना चटका लावून जाणारं आहे.
सुषमा स्वराज यांना रात्री ९ च्या सुमारास एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. तेथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. सुषमा स्वराज मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात परराष्ट्रमंत्री होत्या. एक ते दीड वर्षापूर्वी त्यांची किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. लोकसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय त्यांनी त्यानंतर जाहीर केला होता. प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही महिन्यांपासून त्या सक्रिय राजकारणापासून दूर होत्या.
निधनापूर्वी केलेला शेवटचा कॉल त्यांच्याबद्दल खूप काही सांगून जातो-
सुषमा स्वराज यांनी निधनापूर्वी आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांच्यासाठी लढणारे ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांना फोन केल्याचे समोर आले आहे. साळवेंना त्यांनी एक रुपया घेऊन जाण्यासाठी घरी बोलाविले होते. साळवे एक रुपया फीस घेऊन कुलभूषण जाधव यांची केस लढत आहेत.
त्यांनी कलम ३७० वरून केलेले ट्विटही व्हायरल होत आहे. त्यांनी निधनाच्या काही तासांपूर्वी हे ट्विट केले होते. हे ट्विट व्हायरल होत असताना त्यांनी निधनापूर्वी हरीश साळवेंना केलेला फोनही सर्वांना चटका लावून जात आहे.
साळवे म्हणाले, की आज ८ वाजून ५० मिनिटांनी त्यांच्याशी बोलणं झाले आणि त्यानंतर काही वेळातच त्यांच्या निधनाची बातमी ऐकून मी सुन्न झालो. उद्या संध्याकाळी ६ वाजता तुम्ही तुमची फी घ्यायला या, असेही त्यांनी सांगितले होते. सध्या काय बोलावे हे सुचत नाही. त्या एक ज्येष्ठ मंत्री होत्या. त्यांच्या निधनाने मी माझी मोठी बहिण गमावली.
सुषमा स्वराज यांच्यासोबतचे ते बोलणे अखेरचे ठरेल याची कल्पनाही नसलेले साळवे ही आठवण सांगताना भावूक झाल्याचे पहायला मिळाले. छोट्या छोट्या गोष्टींपासून ते कुलभूषण जाधव आणि गीताच्या सुटकेसाठी मनापासून प्रयत्न केले होते. त्यासाठी देश त्यांचा कायमच कृतज्ञ राहील.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.