भारतीय टीम वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेली आहे. वर्ल्डकपनंतर भारताचा हा पहिलाच दौरा आहे. वर्ल्डकपमध्ये भारतीय टीमने जबरदस्त कामगिरी केली होती. पण सेमीफायनलमध्ये भारताचे फलंदाज अपयशी ठरले आणि भारताचे आव्हान संपुष्टात आले. भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी नुकताच टीम इंडिया-ए ने वेस्ट इंडिजचा दौरा केला होता.
वेस्ट इंडिज-ए विरुद्ध झालेल्या या वनडे सीरिजमध्ये टीम इंडिया-एचा ४-१ने दणदणीत विजय झाला. या दौऱ्यात टीम इंडियाच्या दोन खेळाडूंनी दमदार कामगिरी केली होती. त्यामध्ये शुभमन गिल आणि महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाड याचा समावेश होता. दोघेही आपल्या कामगिरीच्या बळावर भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाचा दरवाजा ठोठावत होते. पण त्यांना संधी मिळाली नाही.
भारतीय संघात आजपर्यंत अनेक महाराष्ट्रीयन खेळाडूंनी आपला ठसा उमटवला आहे. सुनील गावस्कर, संदीप पाटील, सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाने यांच्यासह अनेकांनी विश्व गाजवले आहे. आता टीम इंडियाचा अजून एक मराठमोळा शिलेदार दरवाजा ठोठावत आहे. हा शिलेदार आहे ऋतुराज गायकवाड.
कोण आहे ऋतुराज गायकवाड-
टीम इंडियाचा दरवाजा ठोठावणारा हा मराठमोळा शिलेदार पुण्याचा आहे. ऋतुराज गायकवाडने २०१६-१७ मध्ये महाराष्ट्र टीममध्ये आपल्या रणजी करिअरची सुरुवात केली. ऋतुराजने त्यानंतर आपल्या कामगिरीच्या बळावर आपला वेगळा ठसा उमटवला. त्याची निवड नंतर विजय हजारे ट्रॉफी, देवधर ट्रॉफी सह नंतर चेन्नई सुपरकिंग्स मध्ये झाली.
२०१६-१७ च्या विजय हजारे स्पर्धेमधून ऋतुराज गायकवाड पहिल्यांदा प्रकाशझोतात आला. त्या मोसमात ऋतुराजने ७ मॅचमध्ये ४४४ रन केले. २०१६-१७च्या विजय हजारे स्पर्धेत ऋतुराज सर्वाधिक रन करणारा तिसरा खेळाडू होता.
नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिज-ए संघाविरुद्धच्या दौऱ्यात दिमाखदार कामगिरी त्याने केली आहे. वेस्ट इंडिज दौराच नाही तर जून २०१९ साली झालेल्या श्रीलंका-ए विरुद्धच्या सीरिजमध्येही ऋतुराजने उत्कृष्ट कामगिरी केली होती. वेस्ट इंडिजविरुद्धच्या या सीरिजमध्ये ऋतुराजने २०७ रन केले. या सीरिजमध्ये सर्वाधिक रन करणारा ऋतुराज हा दुसरा खेळाडू आहे. शुभमन गिलने या सीरिजमध्ये सर्वाधिक २१८ रन केले.
२२ वर्षीय ऋतुराज हा ओपनिंगला खेळतो. ओपनिंगला खेळत मागच्या ८ मॅचमध्ये ११२.८३ च्या सरासरी आणि ११६.७२ च्या स्ट्राईक रेटने ६७७ रन केले. यामध्ये २ शतकं आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. वेस्ट इंडिज ए विरुद्धच्या सीरिजमध्ये ऋतुराजने ३, ८५, २० आणि ९९ रनची खेळी केली होती. शेवटच्या सामन्यात ऋतुराज ८९ बॉलमध्ये ९९ रन करून आऊट झाला.
श्रीलंका-ए विरुद्ध ऋतुराजने ५ मॅचच्या ४ इनिंगमध्ये ४७० रन केले. यामध्ये नाबाद १८४ रन, नाबाद १२५ रन, ८४ रन आणि ७४ रनची खेळी केली. श्रीलंकेविरुद्धच्या ४ मॅचच्या सीरिजमध्ये ऋतुराज फक्त २ वेळा आऊट झाला.
लिस्ट ए (मर्यादित ओव्हर) कारकिर्दीमध्ये ऋतुराज गायकवाडने ३९ मॅचमध्ये ५७.०८ च्या सरासरीने आणि १०१.५३ च्या स्ट्राईक रेटने २,०५५ रन केले. यामध्ये ५ शतकं आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.