हिंदू धर्मामध्ये घरातील व्यक्तीचे निधन झाल्यास त्या घरातील वारस असणारा पुरुष मुंडन विधीद्वारे केस अर्पण करत असतात हे आपल्याला माहीत आहे. पण भारतात अशी एक जागा आहे जिथे महिला सुद्धा आपला नवस पूर्ण झाल्यावर स्वतःचे केस मुंडन करून अर्पण करत असतात.
तिरुपती बालाजी हे भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थान आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने लोक इथे येऊन आपले केस अर्पण करत असतात. पण यामागे काय कारण आहे ? हा प्रथा कशी सुरु झाली ? चला तर आज या विषयाबद्दल जाणून घेऊया…
तिरुपतीच्या बालाजीला केस अर्पण करण्याची परंपरा कधीपासून आहे ?
तिरुपतीच्या बालाजीला केस अर्पण करण्याची परंपरा खूप जुनी आहे. हिंदू धर्मग्रंथानुसार देवी लक्ष्मी वैकुंठातून नाराज होऊन पृथ्वीवर आली आणि एका राजाच्या पोटी जन्म घेऊन पद्मावती नाव धारण करून राहू लागली.
तिला शोधात शोधात भगवान विष्णूही व्यंकटेश नावाने पृथ्वीवर आले आणि पद्मावती जवळ पोहोचले. त्यांनी राजकुमारी पद्मावतीला लग्नाची मागणी घातली. पण पृथ्वीवरील समाजमान्यतेनुसार एका राजकुमारीसोबत लग्न करायचे असेल ते त्यासाठी तेवढे धनवाण असावे लागते.
व्यंकटेशाने पद्मावतीसोबत लग्नासाठी घेतले कुबेराकडून कर्ज
पद्मावती सोबत लग्न करण्यासाठी व्यंकटेशाकडे धन नव्हते. ही समस्या सोडवण्यासाठी व्यंकटेशाने भगवान शिव आणि ब्रह्माला साक्षीदार ठेवून कुबेराकडून कर्ज घेतले. कुबेराकडून हे कर्ज घेताना व्यंकटेशाने वचन दिले होते की, कलियुगाचा अंत होईपर्यंत ते कुबेराचे घेतलेले सर्व कर्ज आणि त्यावरील व्याज फेडत राहतील. त्यानंतर व्यंकटेश आणि पद्मावतीचे लग्न पार पडले.
आपल्या देवाच्या डोक्यावरील कर्ज फिटण्यासाठी आपणही हातभार लावला पाहिजे अशी बालाजीच्या भक्तांची मनोधारणा आहे, त्यातूनच ते बालाजीला मोठ्या संख्येने धन, संपत्ती अर्पण करतात. यामुळेच बालाजी भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थान बनले आहे.
बालाजीला केस का अर्पण केले जातात ?
तिरुपतीच्या बालाजीबाबत अशी धार्मिक मान्यता आहे की, जो व्यक्ती आपल्या मनातील सर्व पाप आणि वाईटपणा इथेच सोडून येतो त्याच्या डोक्यावरील सगळे कर्ज देवी लक्ष्मीच्या कृपेने संपून जाते. त्यामुळे लोक आपला वाईटपणा आणि पापाच्या रूपात आपले केस इथे बालाजीला अर्पण करतात.
तिरुपतीच्या बालाजीला दररोज जवळपास २०००० लोक आपले केस अर्पण करतात. त्यासाठी मंदिराच्या परिसरात जवळपास ६०० नाभिक ठेवण्यात आले आहेत. त्यासाठी काहीही शुल्क घेतले जात नाही. या केसांचे पुढे काय केले जाते ते पाहूया पुढच्या लेखात…
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.