बहुतेक या माणसाचा फोटो पाहून तुम्ही याला ओळखले नसणार ! पेहरावा वरुन तर हा माणूस कुठल्या तरी आर्मी मधील अधिकारी वाटत आहे. पण आपल्याला माहित आहे का, की जर हा माणूस नसता तर कदाचित आजचे हे जग सुद्धा नसते. या माणसाने न जाणो कित्येक कोट्यावधी लोकांचा आणि मानवी संस्कृतींचा जीव वाचवला आहे. आज आपण याच तारणहारा बद्दल जाणून घेणार आहोत…
कोण आहे हा तारणहार ?
या तारणहाराचे नाव आहे स्टॅनिस्लाव्ह पेट्रोव ! गेली ३७ वर्ष लष्करी जगतात “जगाला वाचवणारा माणूस” अशी स्टॅनिस्लाव्हची ओळख आहे. रशियाच्या लष्करामध्ये लेफ्टनंट कर्नल या पदावर तो काम करत होता. १९ मे २०१७ रोजी हा माणूस जग सोडून गेला, जगाला वाचविणाऱ्या या माणसाचे निधन झाल्याचे वृत्त समजायला जगाला ७ सप्टेंबर २०१७ हा दिवस उजाडावा लागला होता. स्टॅनिस्लाव्ह यांच्यावर चित्रपट काढणाऱ्या जर्मन चित्रपट निर्माते कार्ल शूमाकर यांच्यामुळे जगाला त्यांच्या निधनाचे वृत्त समजले.
स्टॅनिस्लाव्ह पेट्रोव यांनी नेमकं काय केलं ?
स्टॅनिस्लाव्ह पेट्रोव यांनी आपली समजूतदारी दाखवून जगाला तिसऱ्या महायुद्धातून वाचवण्याचे काम केले होते. त्यांच्या एका महत्वाच्या निर्णयामुळे अमेरिका आणि रशियातील संभाव्य अणुयुद्ध टळले होते. अमेरिका आणि रशियात शीतयुद्धाचा तो काळ ! २६ सप्टेंबर १९८३ हा तो दिवस !
वयाच्या ४४ व्या वर्षी पेट्रोव रशियाच्या आण्विक सूचना केंद्रावर कार्यरत असतानाची ही गोष्ट आहे. पेट्रोवची शिफ्ट संपायला अजून काही अवकाश बाकी होता. तेवढ्यात रडारच्या स्क्रीनवर चुकून अलार्म वाजायला लागला. अमेरिकेने डागलेले क्षेपणास्त्र रशियाच्या राजधानी मॉस्कोच्या दिशेने येत असल्याची सूचना झळकली आणि…
असे वाचले जग !
पण पेट्रोव यांनी हुशारी दाखवत “अमेरिका एवढी मूर्ख नाही की आंतरखंडीय क्षेपणास्त्र रशियावर टाकेल” असा विचार केला.त्यांनी ही सूचना बाहेर प्रसिद्ध करण्यास मनाई केली. पण तेवढ्यात अमेरिकेने पाच क्षेपणास्त्रे डागल्याची अजून एक सूचना मिळाली. पेट्रोव्ह यांनी अंतर्मनाचा आवाज ऐकला आणि “ही सूचना चुकीची आहे” असे वरिष्ठांना सांगितले.
त्यांनी लगेच रडार ऑपरेटरला फोन केला आणि त्याला सांगितले की पूर्वसूचना प्रणालीत काहीतरी गडबड आहे. नंतर जेव्हा तपस केला असता लक्षात आले की पेट्रोव यांनी सांगितले ते बरोबर आहे. रशियाच्या उपग्रहांनी सूर्यकिरणांच्या ढगांतून होणाऱ्या परावर्तनालाच क्षेपणास्त्र समजून धोक्याची सूचना दिल्या होत्या. रडार प्रणालीत खरोखरच गडबड होती, त्यामुळेच चुकीची सूचना रडारच्या स्क्रीनवर दिसत होती. पेट्रोव यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे तिसरे महायुद्ध टळले.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.