सलग तीन वेळा दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या शिला दीक्षित यांचे आज वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. दिल्लीच्या एस्कॉर्ट रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या मागील काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होत्या. त्यांच्या निधनानंतर अनेक दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे.
खासरेवर जाणून घेऊया शिला दीक्षित यांचा राजकीय जीवनप्रवास-
शीला दीक्षित यांचा जन्म १९३१ मध्ये पंजाबच्या कपूरथला मध्ये झाला. त्यांचे शिक्षण दिल्लीमध्ये कॉन्व्हेंट ऑफ जीसस आणि मैरी शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी दिल्ली विश्वविद्यालयात मिरांडा हाऊस कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन आणि मास्टरचे शिक्षण घेतले.
शिळा दीक्षित यांच्या राजकीय जीवनप्रवासाची सुरुवात १९८४ मध्ये झाली. शीला दीक्षित यांचा विवाह काँग्रेसचे दिवंगत नेते उमाशंकर दीक्षित यांचा मुलगा विनोद दीक्षित बरोबर झाला. पंजाबी असलेल्या शीला दीक्षित नंतर ब्राम्हण झाल्या. त्यांनी आपल्या सासरचा राजकीय वारसा अगदी यशस्वीपणे पुढे चालवला.
१९८४ मध्ये इंदिरा गांधींची हत्त्या झाल्यानंतर शीला दीक्षित पहिल्यांदा कनोज येथून लोकसभेची निवडणूक लढल्या आणि विजयी होऊन लोकसभेत पोहचल्या होत्या. त्यांचे गांधी कुटुंबासोबत खूप जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांना राजीव गांधी सरकारमध्ये संसदीय कार्य राज्यमंत्री बनवण्यात आले आणि PMO मध्ये देखील मंत्री बनण्याची संधी मिळाली.
१९८६ ते १९८९ पर्यंत त्या केंद्रीय मंत्री होत्या. १९९० मध्ये उत्तर प्रदेशमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध त्यांनी आवाज उठवला होता. त्यावेळी त्यांना आणि त्यांच्या ८२ साथीदारांना २३ दिवस जेलमध्ये टाकण्यात आले होते. या आंदोलनानंतर शीला दीक्षित या देशभरात प्रसिद्ध झाल्या होत्या.
१९९८ मध्ये सोनिया गांधी राजकारणात आल्यानंतर शीला दीक्षित या पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाल्या. सोनिया गांधींनी त्यांना दिल्लीची जबाबदारी सोपवली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे बघितले नाही. केंद्रात भाजपचे सरकार आले गेले आणि काँग्रेसचे सरकार आले तरी शीला दीक्षित या दिल्लीत सलग १५ वर्षे सत्तेत राहिल्या.
२०१७ मध्ये त्यांना उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसने मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार म्हणून देखील घोषित केले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना राहुल गांधींनी पुन्हा एकदा दिल्लीची जबाबदारी दिली होती. त्यांनी ईशान्य दिल्लीमधून लोकसभेची निवडणूक लढवली मात्र त्यांना भाजपाच्या मनोज तिवारी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.
शीला दीक्षित यांना खासरेकडून भावपूर्ण श्रद्धांजली. माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.