वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्याचा निकाल “जो जास्त चौकार मारेल तो विजयी” या नियमावरून ठरवण्यात आला. इंग्लंडने तर वर्ल्ड कप जिंकला पण न्यूझीलंड संघ चांगला खेळूनही त्यांना हार पत्करावी लागली. अशा किचकट आणि अजब नियमामुळे आयसीसीवर टीकांचा अक्षरशः पाऊस पडत आहे.
भले क्रिकेट फॅन्सना आयसीसीचा हा निर्णय आवडला नसेल, पण समस्त फेसबुकी क्रिकेट समीक्षकांच्या शिष्टमंडळाने यावर एक तोडगा काढला आहे. भविष्यात जर मॅच टाय होऊन आताच्या सारखीच परिस्थिती आली तर या शिष्टमंडळाने सुचवलेले उपाय अवलंबून पाहावेत. हे नियम सर्वमान्य होणारे कुठलाही क्रिकेट प्रेमी त्या नियमांबद्दल आयसीसीला दोष देऊ शकणार नाही. पाहूया काय आहेत फेसबुकी क्रिकेट समीक्षकांचे ते पाच गावठी नियम…
१) ओलं का वाळलं ?
सर्वप्रथम दोन्ही संघाच्या कॅप्टनला बोलवावे. त्यांच्या खेळाडूंना बाउंड्रीच्या कडेला पडलेल्या दगडाची खपरी शोधून आणण्यास सांगावे. ग्राउंड अंपायरपैकी जो ज्येष्ठ असेल त्या अम्पायरने त्या दगडाच्या एका बाजूवर थुंकावे. दगडाची एक बाजू चांगली ओली करून घ्यावी. नंतर तो दगड दुसऱ्या अम्पायरच्या हातात देऊन त्याला वर फेकायला सांगावे. त्याचवेळी पहिल्या अम्पायरने दोन्ही कॅप्टनपैकी एकाला विचारावे, “ओलं का वाळलं ?” दगड खाली पडताच ज्या संघाची बाजू वर असेल त्याला विजयी घोषित करावे.
२) कोले का ? कोले !
सर्वप्रथम दोन्ही कॅप्टनला बोलवावे. त्यांना आपापल्या संघातील दोन तगड्या खेळाडूंची निवड करण्यास सांगावे. त्यांना पीचवरील दोन्ही बाजूच्या स्टंपपैकी एक स्टंप आणि एक बेल्स काढून आणण्यास सांगावे. नंतर त्या दोन्ही तगड्या खेळाडूंना पटांगणात घ्यावे. दोघांना पटांगणात दोन तीन इंच खोल निमुळता खड्डा घ्यायला सांगावे. नंतर त्या खड्ड्यावर बेल्स ठेवून पाय फाकवुन उभे राहावे.
हातातल्या स्टंप खड्ड्यातील बेल्सला लावून अंपायरला विचारावे, कोले का ? अंपायर जेव्हा कोले म्हणतील तेव्हा स्टंपने खड्ड्यातील बेल्स दोन्ही पायांच्या मधून मागच्या दिशेला कोलाव्यात. नंतर खांद्यापासून बेल्स पडलेल्या ठिकाणापर्यंचे डिस्टन्स मोजून ज्याची बेल्स जास्त लांब गेली त्या संघाला विजयी घोषित करावे.
३) हात फडकी !
मॅच टाय झाल्यास अम्पायरने दोन्ही संघातील कॅप्टन आणि ग्राउंड अंपायरनी एकत्र यावे. बाहेरून पाणी बॉटल मागवून त्याने आपापले हात चांगले धुवून घ्यावेत. नंतर दोन्ही कॅप्टन आणि ग्राउंड अम्पायरपैकी एका अम्पायर असे तिघेजण मिळून हातात हात अडकवत. दुसऱ्या अंपायरने सूचना देताच देताच तिघांनी हात फडकावेत.
हात फडकत असताना तिघांपैकी ज्या कुणाच्या हाताची बाजू इतर दोघांपेक्षा वेगळी असेल त्याला विजयी घोषित करावे. हात फडकीत जर अंपायर विजयी झाला तर त्याला बाहेर काढून दुसऱ्या अम्पायरला हात फडकीत सहभागी होण्याची संधी द्यावी. हे तोपर्यंत करावे जोपर्यंत दोनपैकी एका कुठल्या संघाचा कॅप्टन जिंकत नाही.
४) नंबर पाडणे !
सर्वप्रथम दोन्ही संघाच्या खेळाडूंना पिचसमोर एका ओळीत डोळे बंद करून उभे करावे. ग्राउंडवरच्या दोघा अंपायरपैकी एकाने त्यांच्यावर लक्ष ठेवावे. दुसऱ्या अंपायरने एक बॅट घेऊन खाली पिचवर बेल्सच्या मदतीने १ आणि २ असे नंबर पाडावेत.
नंबरवर बॅट झाकून त्या नंबरसमोर दोन उभ्या रेषा काढाव्यात. त्यांनतर दोन्ही संघाच्या कॅप्टनला बोलावून उजव्या हाताच्या तर्जनीने दोन्हीपैकी एकेक रेषा पकडायला सांगावी. नंतर त्यांना तसेच बोट ठेवायला सांगून बॅट उचलावी. ज्या कॅप्टनचे बोट १ या नंबरसमोरील रेषेवर असेल त्याच्या टीमला विजयी घोषित करावे.
५) माझा का तुझा ?
सर्वप्रथम दोन्ही संघाच्या खेळाडूंना बोलवावे. दोन्ही अंपायरने नेहमीप्रमाणे त्या संघातील कॅप्टनला समोर बोलवावे. ज्या संघाने आधी टॉस जिंकला होता, त्या संघाच्या कॅप्टनला गुडघ्यावर हात ठेवून खाली वाकण्यास सांगावे. खाली विकत असताना सावली पडणार नाही अशा कोनात उभे राहावे.
नंतर दुसऱ्या संघाच्या कॅप्टनला पाठीमागे उभे करून वाकलेल्या कॅप्टनच्या पाठीवर थाप देऊन पाठीपासून थोडं वर हवेत १ किंवा २ बोटे पुढे करावीत. त्यांनतर दुसऱ्या कॅप्टनने वाकलेल्या पहिल्या कॅप्टनला विचारावे, हा माझा का तुझा ? पाठीवर दुसऱ्या कॅप्टनने जे बोट दाखवले आणि आणि वाकलेल्या पहिल्या कॅप्टनने जे उत्तर दिले आहे त्यावरून १ हा नंबर ज्याला मिळेल त्याच्या संघाला विजयी घोषित करावे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.