देवभूमी उत्तराखंड मधील गंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हिंदू तीर्थक्षेत्र ऋषिकेश ! हिमालयाचे प्रवेशद्वार अशी या ठिकाणाची ओळख आहे. इथले शांत वातावरण, डोंगररांगा आणि प्राकृतिक सौंदर्यामुळे भाविक भक्तांसोबतच पर्यटकही मोठ्या संख्येने ऋषिकेशला भेट देत असतात.
१९६० मध्ये “बीटल्स” या जगप्रसिद्ध रॉक बँडचे सदस्य योग शिकण्यासाठी ऋषिकेशला आले होते, तेव्हापासून हे ठिकाण “जागतिक योग राजधानी” म्हणून प्रसिद्ध झाले. इथला “लक्ष्मण झुला” बंद होत असल्याने ऋषिकेश पुन्हा एकदा चर्चेत आहे.
“लक्ष्मण झुला”चा इतिहास काय आहे ?
पुरातन कथेनुसार भगवान श्रीराम जेव्हा रावणाला मारण्यासाठी निघाले होते तेव्हा वाटेत ऋषिकेश येथे गंगा नदी लागली. तेव्हा त्यांच्या लहान भाऊ लक्ष्मणाने तागाच्या दोरखंडाच्या मदतीने गंगा नदी पार केली होती. ज्या बिंदूवर तागाच्या दोरखंडाचा पूल होता, त्याच बिंदूवर १८८९ मध्ये कलकत्याच्या व्यापारी सुरजमल झुहानबला यांनी लोखंडी मजबूत तारांपासून नवीन पूल बनवला. मात्र ब्रिटिशकाळात १९२४ च्या पुरात तो सुद्धा पूल वाहून गेला. त्यांनतर १९२७ ते १९३० या काळात बांधकाम करून आताच “लक्ष्मण झुला” बनवण्यात आला होता.
का बंद झाला लक्ष्मण झुला ?
लक्ष्मण झुला हा सस्पेन्शन ब्रिज असून त्याला कुठलाही पाया नाही. सध्या सुरक्षेच्या कारणास्तव लक्ष्मण झुला बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ९० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला हा पूल जीर्ण झाल्यामुळे धोकादायक अवस्थेत होता.
पूर्वी चारचाकी वाहनेही त्यावरून जायची, मात्र नंतर ती बंद करण्यात आली होती. आता तर सर्वसाधारण लोकांसाठीही तो बंद करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की हा पूल एका बाजूला झुकला आहे. एकाचवेळी जास्त लोक पुलावर आल्यास पूल कोसळण्याची भीती आहे.
स्थानिक लोक, भाविक आणि पर्यटक नाराज
प्रसिद्ध असा लक्ष्मण झुला बंद झाल्यामुळे स्थानिक लोक, भाविक भक्त आणि पर्यटक नाराज झाले आहेत. लक्ष्मण झुला तपोवन क्षेत्रात दळणवळणाचे एकमेव साधन असल्याने तो बंद झाल्याने स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
जवळच लक्ष्मण मंदिर असल्याने तिकडे येणाऱ्या भाविकांनाही २ किमी अंतरावरील शिवानंद झुला चा आधार घ्यावा लागणार आहे. तसेच यामुळे त्या पुलावरही भर येणार आहे. लक्ष्मण झुलावर सीआयडी, अपहरण अशा मालिकांचे आणि गंगा की सौगंध, सन्यासी इत्यादि चित्रपटांचे शूटिंग झाले आहे. हा पूल पाहण्यासाठी येणारे पर्यटकही या निर्णयामुळे नाराज आहेत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.