भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी आज राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. केंद्रात मंत्री बनल्यानंतर खासदार रावसाहेब दानवे यांनी भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. भाजपला आता चंद्रकांत पाटील यांच्या रुपाने नवा प्रदेशाध्यक्ष मिळाला आहे. चंद्रकांत पाटील यांचा राजकीय जीवनप्रवास थक्क करणारा आहे.
खासरेवर बघूया एका गिरणी कामगाराच्या मुलाचा सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बनण्यापार्यंतचा जीवनप्रवास..
चंद्रकांत पाटील यांच्या जीवनात लहानपणीच संघर्ष आला. त्यांचे आई वडील दोघेही निरक्षर. नावाने दोघेही गिरणी कामगार होते पण प्रत्येक्षात काम मात्र त्यांना गिरणी कामगारांपेक्षाही खालच्या स्तरावरील असायचे. वडिलांना फक्त स्वतःच्या नावाची सही करता यायची. त्यांच्या घरात अठराविश्व दारिद्रय होते. गिरणी कामगारांच्या संपत वाताहत झालेल्या अनेक कुटुंबापैकी पाटील कुटुंब हे एक.
चंद्रकांत पाटील यांचे वडील बच्चू पाटील मिलच्या कँटीनमध्ये कामगारांना चहा देण्याचे काम करायचे. तर आई कपड्याच्या कचऱ्यातील चांगला कपडा शोधायचं काम करायची, ते हि त्या कचऱ्यात बसूनच. कुटुंबात पाच बहिणी, आई-वडील असे ८ जणांचे मोठे कुटुंब. मुंबईतील रे रोड रेल्वे स्टेशनच्या जवळील नारळवाडीत दोन खोल्यांमध्ये पाटील कुटुंबीय राहायचे. पाटील कुटुंबीय मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटीचे (खानापूर)आहे.
सिद्धार्थ महाविद्यालयातून बी.कॉम पास झालेल्या दादांना घरातील आर्थिक अडचणींमुळे लगेच नोकरी करावी लागली. महाविद्यालयात असतानाच ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आले. त्यांनी संघटनेच्या कामात स्वतःला झोकून दिले. पुढे त्यांना विविध जबाबदाऱ्या मिळत गेल्या. पुढे मुंबईत आर्थिक अडचणी वाढल्यानंतर ते गावाकडे गेले.
गावाकडे शेती आणि काजूचा कारखाना चालवला. सोबत राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे तीन जिल्ह्यांचे काम केले. त्यानंतर १५ वर्ष ते संघाचं काम करत राहिले. पुढे जेष्ठ नेते दिवंगत प्रमोद महाजन, विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सततच्या आग्रहामुळे ते राजकारणात आले. त्यानंतर त्यांनी पक्षाचे अनेक वर्ष काम केलं आणि २००८ मध्ये पहिल्यांदा विधान परिषदेची निवडणूक लढवत जनता दलाचे तत्कालीन आमदार शरद पाटील यांचा नऊ हजार मतांनी पराभव करून पहिल्यांदा आमदार झाले.
आज प्रदेशाध्यक्ष बनलेल्या चंद्रकांत पाटील यांना २०१४ मध्ये देखील पक्षाने मंत्रिपद किंवा प्रदेशाध्यक्ष पद असे दोन पर्याय दिले होते. पण त्यांनी पक्षावर हा निर्णय सोपवला आणि जो निर्णय असेल तो मान्य असल्याचे सांगितले. त्यावेळी गिरणी कामगाराचा हा मुलगा मंत्री बनला. त्यांना महत्वाची तीन मोठी खाती देण्यात आली. पुन्हा बदल होऊन महसूल मंत्रालयसारखं मोठं खातं देण्यात आलं.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करत असताना विद्यमान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत त्यांची चांगली ओळख होऊन पुढे मैत्री झाली. २०१४ च्या सत्तापरिवर्तनाच्या वेळी चंद्रकांत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांनी ती यशस्वीपणे पार पाडली होती.
चंद्रकांत दादांनी आपली पूर्ण कारकीर्द स्वता घडवली. निष्ठेने काम करत हा गिरणी कामगाराचा मुलगा आज सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बनला आहे. चंद्रकांत दादांना त्यांची पुढील राजकीय आयुष्यासाठी खसरेकडून मनपूर्वक शुभेच्छा.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.