नुकतेच काही दिवसांपूर्वी दक्षिण कोरिया मधील एक बातमी चांगली चर्चेत होती. जवळपास १००० लोकांच्या हॉटेल रुममध्ये गुपचूप छुपा कॅमेरा लावून त्यांचे रेकॉर्डिंग करण्यात येत होते. काही दिवसांपूर्वी भारतात सुद्धा उत्तराखंड राज्यात हॉटेलमध्ये मुक्कामाला थांबलेल्या एका जोडप्याला त्यांच्या रुममधील सिलिंग फॅनमध्ये लावण्यात आलेला छुपा कॅमेरा निदर्शनास आला. हॉटेल रुम, लेडीज बाथरुम किंवा कपड्यांच्या दुकानातील ट्रायल रुममध्ये छुपा कॅमेरा किंवा रेकॉर्डिंग डिव्हाईस सापडल्याचे अनेक प्रकारही उघडकीस आले आहेत.
अशा घटनांच्या व्हिडीओ क्लिप्स किंवा फोटो वेगवेगळ्या सोशल माध्यमांवर किंवा पोर्नोग्राफिक वेबसाईट्सवर शेअर झाल्यामुळे कित्येकांनी भीतीने किंवा शरमेने आत्महत्या केल्या आहेत. अशामध्ये तुम्हीही या प्रकारांची शिकार होऊ नये यासाठी तुम्हाला अधिक सतर्क आणि सावधान राहण्याची आवश्यकता आहे.
या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, अशा हॉटेल रुम, लेडीज बाथरुम किंवा ट्रायल रुममधील छुपे कॅमेरे किंवा व्हिडीओ रेकॉर्डिंग साधने आपण स्वतःच कशी तपासायची…
१) रुममध्ये प्रवेश करताच हे करा
जेव्हा तुम्ही हॉटेलच्या रुममध्ये प्रवेश करता तेव्हा रुमच्या अशा जागा बघा जिथून रुम मधील बेड आणि संपूर्ण रुम चांगल्या पद्धतीने दिसत असेल. कारण या त्याच जागा असतात जिथे कॅमेरा लपवून त्याद्वारे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले जाऊ शकते. मग त्यामध्ये रुममधील आरसा असो, सजावटीच्या वस्तू असोत किंवा कपाट वगैरे वस्तू असतील. या गोष्टी सुरुवातीलाच नक्की तपासून बघा.
२) इलेक्ट्रिक जोडण्या बघा
रुममध्ये लपवण्यात आलेला कॅमेरा चालण्यासाठी त्याला विद्युत पुरवठ्याची आवश्यकता असते. त्यामुळे रुम मधील सर्व इलेक्ट्रिक साधनांची तपासणी अवश्य करा. मग त्यात रुममध्ये दिसणारी अशी कुठली तार का असेना जिची काहीच गरज नसते किंवा अशी लाईट जी सतत चालूबंद होत असेल. त्यांनतर एकदा रुममधील सगळ्या लाईट्स व्यवस्थित बंद करून रुममध्ये कुठे लेन्स तर चमकत नाही ना याची खात्री करा.
३) आरशावर नखाची युक्ती
तुम्ही जेव्हा कधी कपड्यांच्या दुकानातील ट्रायल रुम किंवा चेंजिंग रुममध्ये कपडे ट्रायल करण्यासाठी जाल तेव्हा सगळ्यात आधी Finger Nail On Mirror या ट्रिकचा वापर करा. त्यासाठी आपल्या बोटाचे नख ट्रायल रुममधील आरशावर टेकवा आणि तुमच्या बोटाचे नख आणि त्याचे प्रतिबिंब यात गॅप तर नाही ना ते बघा.
असे करण्याने तुम्ही जाणून घेऊ शकता की ट्रायल रुममध्ये लावलेल्या आरशाच्या मागे कुठला कॅमेरा तर लावलेला नाही. जर नख आणि त्याचे प्रतिबिंब यात कसलाच गॅप दिसत नसेल तर मग त्याचा अर्थ असा की आरशाच्या दुसऱ्या बाजूला कॅमेरा लपवला असण्याची शक्यता आहे.
४) स्मार्टफोनच्या मदतीने शोध छुपा कॅमेरा
छुपा कॅमेरा शोधण्यासाठी तुम्ही आपल्या स्मार्टफोनमध्ये Hidden Camera Detector, Glint Finder, Spy Cam Finder सारखी ऍप्लिकेशन्स इन्स्टॉल करु शकता. याशिवाय जर ट्रायल रुम किंवा हॉटेल रुम मधून तुम्ही कुणाला फोन लावला आणि बोल्ट असताना कुठला अडथळा येतोय का ते तपासून बघा.
जर रुममध्ये कुठला कॅमेरा असेल तर तो फोन सिग्नल कॅप्चर करेल आणि फोनमध्ये खरखर आवाज येईल. सोबतच स्मार्टफोनचा वायफाय ऑन करून स्कॅन केल्यास Available Device मध्ये कॅमेरा डिव्हाईस सापडू शकते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.