आयसीसीचा बारावा वर्ल्ड कप इंग्लंडने जिंकला. न्यूझीलंड शर्थीने खेळला पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. कदाचित भारत फायनलला खेळला असता तर वेगळेच चित्र असते. पण सेमीफायनल मध्येच भारताचा पराभव झाला आणि वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. सध्या भारतीय संघाचा आढावा बैठकांवर जोर आहे.
बीसीसीआयची प्रशासक समिती संघाच्या मॅनेजमेंट टीमचा क्लास घेण्याच्या मूडमध्ये आहे. आढावा बैठकीत कॅप्टन विराट कोहली, कोच रवी शास्त्री आणि संघ निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांना खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे मागितली जातील असे स्वतः प्रशासक समितीचे प्रमुख विनोद रॉय यांनी सांगितले. यातले तीन प्रमुख प्रश्न कोणते असतील ?
१) निवड समितीला प्रश्न : अंबाती रायडूला का संधी दिली नाही ?
निवड समितीने अंबाती रायडूला अंतिम १५ जणांच्या संघात घेतले नाही. त्याच्याकडे दुर्लक्ष केले. अंबाती रायडू चौथ्या क्रमांकाच्या बॅटमॅनच्या स्वरूपात सर्वात उपयोगी पर्याय होता. पण त्याला संघातून वगळले. यानंतर अंबाती रायडूने क्रिकेट मधून संन्यास जाहीर केला. निवड समितीने अंबाती रायडूला का संधी दिली नाही या प्रश्नाचे उत्तर त्यांना द्यावे लागणार आहे. निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद या प्रश्नाचे नेमके कसे उत्तर देतात ते पाहण्यासारखे आहे.
२) कॅप्टन विराट कोहलीला प्रश्न : टीम तीन/चार विकेटकिपर घेऊन का खेळत होती ?
यंदाच्या वर्ल्ड कप मध्ये आपण पहिले असेल भारतीय टीममध्ये तीन ते चार विकेट किपर होते. महेंद्रसिंग धोनी, दिनेश कार्तिक, के.एल.राहुल आणि रिषभ पंत. दिनेश कार्तिक आणि रिषभ पंतला संधी मिळालेल्या सामन्यात त्यांचे प्रदर्शन काय खास राहिले नाही. संघात धोनीसारखा चांगला अनुभवी आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात उत्कृष्ट कामगिरी केलेला विकेटकिपर कम बॅट्समन असताना कोहली तीन ते चार विकेटकिपर घेऊन खेळण्यामागचे काय कारण होते ?
३) कोच रवी शास्त्रीला प्रश्न : धोनीला चौथ्या ऐवजी सातव्या क्रमांकावर बॅटिंगला का पाठवले ?
न्यूझीलंड विरुद्धच्या सेमीफायनल सामन्यात भारतीय संघाच्या ५ धावांत ३ विकेट पडलेल्या असताना चौथ्या क्रमांकावर धोनीसारख्या अनुभवी बॅट्समनला पाठवायला हवे होते असे मत अनेक क्रिकेट तज्ञ आणि माजी खेळाडूंनी व्यक्त केले आहे. सांगितले जाते की हा निर्णय बॅटिंग कोच संजय बांगर यांचा होता. पण मग प्रमुख कोच रवी शास्त्री यांनी आपला अधिकार वापरून धोनीला चौथ्या क्रमांकावर का पाठवले नाही ?
कधी आहे आढावा बैठक ?
आढावा बैठकीची तारीख अजून काय निश्चित झाली नाही. प्रशासक समिती प्रमुख विनोद रॉय ही मिटिंग घेतील. त्यांनी सांगितले की “कोच आणि कॅप्टन जसे विश्रांतीनंतर परत येतील, त्यांनतर आम्ही एक आढावा बैठक घेऊ. त्याची तारीख आताच सांगता येणार नाही. पण आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सोबतच आम्ही निवड समिती प्रमुखांसोबतही चर्चा करणार आहोत.” आता ही मिटिंग कधी होतेय ते पाहण्यासारखे आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.